नाशिक : सार्वजनिक वाचनालयामध्ये सुरू असलेल्या मनमानी कामकाजाच्या पार्श्वभूमीवर सावानाकडून गठीत केलेल्या अभ्यास समितीच्या अहवालावर वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदच अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. सार्वजनिक वाचनालयाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात बुधवारी (दि. २५) या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांच्यासह अभ्यास समितीतील सदस्य रमेश देशमुख, श्रीधर व्यवहारे, सनदी लेखापाल सीए सी. जे. गुजराथी यांच्या उपस्थितीत झालेल्या या पत्रकार परिषदेत श्रीधर व्यवहारे आणि वास्तू विशारद अनिल चोरडिया यांचे अहवाल स्वीकारण्यात आले तसेच अॅड. नागनाथ गोरवाडकर, दिगंबर गाडगीळ, रमेश देशमुख आणि विश्वास ठाकूर यांनी अध्यक्षांकडे सुपूर्द केलेल्या अहवालांच्या प्रतीदेखील प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना देण्यात आल्या. पत्रकार परिषदेदरम्यान अभ्यास समितीतील सदस्यांनी सावानामध्ये झालेल्या अनियमित कारभाराचा अभ्यास करताना समोर आलेले मुद्दे मांडताना सन २०१४ ते २०१६ या कालावधीत एक कोटी ९० लाख रुपयांची कामे झाली असून, या कामकाजात तथ्य असल्याची माहिती दिली. संस्थेचे अध्यक्ष औरंगाबादकर यांनी प्राप्त झालेल्या अहवालावर आपला पुरेसा अभ्यास झालेला नाही. रविवारी होणाऱ्या वार्षिक सभेतच सभासद अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती यावेळी दिली. (प्रतिनिधी)
वार्षिक सभेत होणार अंतिम निर्णय
By admin | Published: January 26, 2017 12:09 AM