पाथरे : शाळा सुटण्याच्या अगोदर गावात बस येत असल्याने शहा येथील श्री भैरवनाथ हायस्कूल व एस.जी. कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शेवटच्या तासावर पाणी सोडावे लागत होते. विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टळावे यासाठी महाविद्यालय प्रशासनाने सिन्नर आगारातील एसटीच्या अधिकाऱ्यांपुढे कैफीयत मांडली आणि आगार व्यवस्थापक भूषण सूर्यवंशी यांनी बसची वेळ शाळा सुटण्याच्या वेळी केल्याने विद्यार्थ्यांचा शेवटचा तास गोड झाला.शाळा सुटण्याच्या अगोदर म्हणजेच ४.२० वाजता बस शहा येथे येत होती. त्यामुळे जवळपास पन्नास विद्यार्थ्यांचा शेवटचा तास होत नव्हता. ही अडचण अनेक दिवसांपासून होती. यासंदर्भात प्राचार्य सुनील गडाख यांनी आगार व्यवस्थापक यांना अनेक वेळेस लेखी, तोंडी सूचना क्र ीडाशिक्षक आर.डी.रौंदळ, जे.के.बडगुजर, आर.डी.कोकाटे यांच्या मार्फत केल्या होत्या पण यावर योग्य तो तोडगा निघाला नव्हता. काही दिवसांपूर्वी सिन्नर आगार व्यवस्थापक म्हणून नियुक्त झालेले भूषण सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणीची दखल घेत एसटी बस ५ वाजता शाळेच्या गेट पर्यंत येईल, असे शाळेत येऊन विद्यार्थ्यांना आश्वासन दिले आणि त्याची पूर्तताही केली. यावेळी, सहाय्यक वाहतूक अधिक्षक सुरेश दराडे, वाहतूक नियंत्रक प्रमोद घोलप यांनीही विद्यार्थ्यांना बस सुविधेबाबत व सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले. विद्यालयाच्या वतीने प्राचार्य सुनील गडाख, पर्यवेक्षक संजय जाधव, क्र ीडाशिक्षक रमेश रोंदळ, सलीम चौधरी यांच्या हस्ते अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
..अन् विद्यार्थ्यांचा शेवटचा तास गोड झाला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 4:13 PM
बसची वेळ बदलली : शैक्षणिक नुकसान टळले
ठळक मुद्देशाळा सुटण्याच्या अगोदर म्हणजेच ४.२० वाजता बस शहा येथे येत होती.