लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जुने नाशिकमधील मनपाच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती होऊन २२ रुग्ण दगावल्याची दुर्दैवी घटना घडली. सुरुवातीला रुग्णालयाच्या द्वारावर रुग्णवाहिकांची रांग होती, तर दुपारनंतर शववाहिकांच्या फेऱ्या रुग्णालय ते अमरधाम अशा सुरु झाल्या. दोन ते तीन रुग्णवाहिकांमधून मृतदेहांचा प्रवास सुरू झाला. एका रुग्णवाहिकेत तीन मृतदेह ठेवून वाहतूक करण्याचा बाका प्रसंग यावेळी मनपा प्रशासनावर ओढवला. हे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते.
गोरगरीब कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या मनपाच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात घडलेल्या या भीषण दुर्घटनेत निष्पाप २२ जीवांचे प्राण गेले. ऑक्सिजनच्या टाकीला गळती लागली. रुग्णालयात खाटांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा वेगाने कमी होऊ लागला. ऑक्सिजन पुरवठ्याचा पुरेसा दाब मिळू न शकल्यामुळे रुग्णालयातील कोविड वॉर्डात ऑक्सिजन, व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांचा श्वास गुदमरायला लागला. त्यांची तडफड बघून नातेवाईकांच्या जीवाची घालमेल सुरु झाली. नातेवाईकांनी आपल्या रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी त्यांचे तळपाय, तळहात चोळण्यास सुरुवात केली तर काहींनी त्यांची छाती चोळली, तर अनेकांची छाती दाबून (सीपीआर) श्वास थांबणार नाही, याचा प्रयत्नही केला. मात्र, अनेकांचे हे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले आणि काळाने कोणाची आजी, कोणाचा पती, तर कोणाचा भाऊ-बहीण त्यांच्यापासून कायमचे हिरावून नेले. यावेळी नातेवाईकांनी फोडलेला टाहो अन् आक्रोश हा झाकीर हुसेन रुग्णालयाच्या भितींसह शासकीय, प्रशासकीय यंत्रणेलाही हादरवून सोडणारा होता. अनेकांच्या डोळ्यांमधून वाहणाऱ्या अश्रूधारा या थांबता थांबत नव्हत्या. ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या मुख्य टाकीला तांत्रिक दोषामुळे गळती लागली आणि उपचार घेणाऱ्या रुग्णांवर काळाने झडप घातली.
--इन्फो--
काहींनी खांद्यावर, तर काहींनी स्ट्रेचरद्वारे वाहिले ऑक्सिजन सिलिंडर
रुग्णांना ऑक्सिजन मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी जमेल त्या पध्दतीने सर्वत्र शोधाशोध करत दुचाकींवरून, तर काहींनी खांद्यावरून काळ्या रंगाचे मोठे ऑक्सिजन सिलिंडर झाकीर हुसेन रुग्णालयात वाहून आणले. एकूणच आपल्या रुग्णाचा जीव वाचला पाहिजे, यासाठीच ही सगळी धावपळ नातेवाईकांकडून यावेळी सुरु होती.
--इन्फो--
दुर्घटनेतील मृतांचे मृतदेह दोन ते तीन रुग्णवाहिकांमधून वाहून नेताना त्यांच्या नातेवाईकांकडून फोडण्यात येणारा टाहो हा मन सुन्न करणारा होता. एकापाठोपाठ एक रुग्णवाहिका रुग्णालयात दाखल होत होत्या. रुग्णालयाचे कर्मचारी नातेवाईकांच्या मदतीने मृतदेहांची ओळख पटवून त्यांची मूळ माहिती नोंदवून घेत शववाहिकेत मृतदेह ठेवत अंत्यसंस्कारासाठी सोपवित होते. हे सर्व मृतदेह प्लास्टिकच्या आवरणात बंदिस्त करण्यात आलेले होते.
----
फोटो - २१पीएचएपी ११३/१०८