सिन्नर : सिन्नर - शिर्डी महामार्गाच्या चौपदरीकरणासाठीची भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, सिन्नर तालुक्याच्या हद्दीतील १९ गावांतील जमिनी या ुरुंदीकरणासाठी संपादित होत असून, त्या-त्या शेत गट नंबरमधील संपादित क्षेत्रात येणारी फळझाडे, वनझाडे, विहीर, बोअरवेल व बांधकामांची पडताळणी भूसंपादनच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी हाती घेतली आहे.तालुक्यातील गुरेवाडी, शहापूर, खोपडी बुद्रुक, खोपडी खुर्द, फर्दापूर, भोकणी, धारणगाव, पांगरी खुर्द, फुलेनगर, दुसंगवाडी, पिंपरवाडी, मिरगाव, वारेगाव, पाथरे खुर्द, पांगरी बुद्रुक, वावी, मुसळगाव, कुंदेवाडी मजरे, केदारपूर या १९ गावांच्या हद्दीतील ५७.५०० किलोमीटर ते ९८.२५० किलोमीटर अंतरातील क्षेत्र सिन्नर-शिर्डी महामार्गाच्या रुंदीकरणासाठी संपादित होत आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक १६० च्या रुंदीकरणासाठी संबंधित गावातील संपादित क्षेत्रात येणारी फळझाडे, वनझाडे, विहीर, बोअरवेल व बांधकाम आदींचे मूल्यांकन निश्चितीसाठी त्यांची पडताळणी करण्याचे काम भूसंपादन विभागाने हाती घेतले आहे. त्यासाठी भूसंपादन आणि महसूल विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष जागेवर येऊन स्थळपाहणी करणार आहेत. गावनिहाय दिनांंकास संबंधित गट नंबरच्या भूधारकांनी प्रत्यक्ष जागेवर उपस्थित राहण्याबाबत गावोगावी दवंडी देण्यात आली आहे.तसेच नोटीस बोर्डवर प्रसिद्धीही देण्यात आली आहे. दरम्यान, भूसंपादनाचे काम तातडीने पूर्ण होऊन सिन्नर - शिर्डी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्याची मागणी होत आहे. सिन्नर-शिर्डी हा महामार्ग सध्या दुपदरी असून, शिर्डीला नाशिक, गुजरात, आंध्र प्रदेश आदी राज्यांतील भाविक दर्शनासाठी जातात. गुरुपौर्णिमा, दिवाळी, उन्हाळी सुटी या कालावधीत या मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. हा रस्ता चौपदरी होणार असल्यामुळे वाहतूक सुरळीत होऊन अपघातही टळणार आहेत.
सिन्नर - शिर्डी महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 11:06 PM