देवळा : डिसेंबर महिन्यात विक्रमी प्रतिक्विंटल ११ हजार रूपयांचा टप्पा पार केलेल्या कांद्याचा दर आता तीन हजार रु पयांपर्यंत कोसळल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. कांदा शेतकऱ्यांना चिंता मुक्त करणार असे चित्र निर्माण होत असतांनाच कांद्याने सर्वांना पुन्हा चिंताग्रस्त केलेले आहे. देवळा तालुक्यात उन्हाळी कांद्याची लागवड सुरु असुन आता ही लागवड अंतिम टप्प्यात आहे. कांदा रोपांच्या टंचाईनंतरही उन्हाळी कांद्याचे विक्र मी लागवड होण्याची चिन्हे दिसत आहेत.चालूवर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्यानंतर दुष्काळाच्या गर्तेतून बाहेर येत शेतकºयांंनी मोठया आशेने पोळ कांद्याची लागवड केली. या कांद्याचे चांगले उत्पादन मिळेल या अपेक्षेत शेतकरी होते. परंतु अतिवृष्टी व अवकाळी पावसाने शेतकºयांच्या आशेवर पाणी फेरले. कांद्याच्या रोपांनाही याचा फटका बसल्यामुळे शेतकºयांना तीन टप्यात कांदा बियाणे शेतात टाकावे लागले. सुरूवातीला दोन वेळा टाकलेले बियाणे पावसामुळे नुकसान झाले. पाण्याची सर्वत्र उपलब्धता असल्याने उत्पादन देणारे पिक म्हणुन शेतकरी मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांदा लागवडीकडे वळले असून सर्वत्र मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड सुरु झाली. यामुळे मजुरांचा भाव वधारला.गावागावात मजुरांची टंचाई निर्माण झाल्याने शेजारील गावातुन मजुर मागविले जात आहेत. गावातील स्थानिक मजुर आठवडाभर काम केल्यानंतर रविवारी मजुरीचे पैसे शेतकर्यांकडुन घेण्याची पद्धत आजही टिकून आहे.परंतु बाहेरगावाहून येणार्या मजुरांना दिवसभर काम केल्यानंतर सायंकाळी बांधावरच मजुरीचे पैसे द्यावे लागतात.यामुळे शेतकर्यांना पैशांची जमवाजमव करतांना चांगलीच धावपळ करावी लागते. मजूर टंचाईवर मात करण्यासाठी शेतकरी विविध उपाय योजना करत आहे. कांदा लागवड करतांना ठिबक, व तुषार सिंचन पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. यामुळे पीकाला पाणी देण्यासाठी मजुराची गरज लागणार नाही, तसेच हा ठिबक संच आगामी पीकांनाही उपयोगी पडणार आहे.
उन्हाळ कांद्याची लागवड अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 3:32 PM