छावणी परिषदेच्या निवडणुकीसाठी दरवर्षी मतदार यादी सुधारण्याचे काम केले जाते. मात्र करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संरक्षण मंत्रालयाने सर्वच कटक मंडळांना मतदार याद्या सुधारण्याच्या कामाला तात्पुरती स्थगिती दिली होती. आता सात महिन्यांनंतर प्रक्रिया पुन्हा राबवून ३० एप्रिल पर्यंत अंतिम मतदार यादी जाहीर करण्याची सूचना देण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालयाचे उपसंचालक राजेश कुमार साह यांनी सर्वच छावणी परिषदेंना आदेश दिले आहेत.
२०१४ साली छावणी परिषदेच्या निवडणूक पहिल्यांदा पक्षीय चिन्हावर लढवत भारतीय जनता पार्टीने आठ पैकी सहा जागा मिळवल्या तर शिवसेना व अपक्ष एक -एक जागेवर निवडून आले होते. पाच वर्षानंतर सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. व्हेरीड बोर्ड थेट नियुक्तीसाठी माजी उपाध्यक्ष बाबूराव मोजाड, सचिन ठाकरे,कावेरी कासार,तानाजी करंजकर यासह शिवसेनेचे तानाजी भोर, अनिता जगदीश गोडसे यांची नावे चर्चेत असून निवड प्रक्रिया सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.
थेट निवडीबाबत छावणी प्रशासनाकडून अर्ज घेतल्यानंतर निवडक उमेदवारांची मुलाखत घेऊन तीन नावे पाठवली जातात. खासदारांनी दिलेल्या पत्रानुसार निवड अंतिम होते . .छावनी प्रशासनाकडे पुढील कार्यवाहीची माहिती नसली तरी इच्छूकांच्या मात्र दिल्ली, मुंबई, पुण्यासह राजकीय नेत्यांचे दौरे सुरू आहे.
दरम्यान देवळाली छावणी परिषदेच्या सदस्यांची मुदत संपल्याने ११ फेब्रुवारी बोर्ड बरखास्त झाले असून पदसिद्ध ब्रिगेडियर व मुख्य कार्यकारी अधिकारी व्दिसदस्य समिती कारभार बघणार आहे.