देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सामुंडी गावामध्ये विद्युत रोहित्र नादुरुस्त होऊन गेल्या पंधरा दिवसांपासून अंधार दाटून नागरिकांसह विद्यार्थी हैराण होते. तसेच विजेअभावी बँकेचे कामकाज ठप्प झाल्याने नागरिकांची चांगलीच आर्थिक कोंडी झाली होती. परिणामी गावकऱ्यांस ऐन शेतीच्या हंगामात आलेल्या आर्थिक अडथळ्यांमुळे चांगलीच पंचाईत झाली होती. अखेर पंधरा दिवसांनंतर ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच गावामध्ये विजेचे दर्शन घडल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान, विद्युत रोहित्र नादुरुस्त झाल्याने खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करूनही सामुंडीकरांना महावितरण विभागाकडून नवीन रोहित्र बसविण्यात टाळाटाळ करण्यात येत होती. तब्बल पंधरा दिवस होऊनही नागरिकांच्या मागणीचा विचार केला जात नसल्याने नागरिक हतबल झाले होते. अखेर दि. ५ जुलै रोजी ‘लोकमत’मध्ये ‘पंधरा दिवसांपासून सामुंडीकर अंधारात’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित होताच महावितरण विभागाने काही तासांतच दुपारी ३.३० वाजता नवीन विद्युत रोहित्र बसवून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. त्यामुळे नागरिकांनी ‘लोकमत’चे आभार मानले आहे.
विजेअभावी बँकेतील व्यवहार ठप्प झाल्याने ज्येष्ठ नागरिक, निराधार महिला व घरकुल लाभार्थी यांना बँकेचे कामकाज बंद असल्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला. ग्रामीण आदिवासी, दुर्गम भागातील गोरगरिबांना आर्थिक व्यवहार ठप्प असल्याने मोठी पंचाईत निर्माण झाली होती. तसेच विद्यार्थ्यांचा ऑनलाइन अभ्यास होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांचेही अतोनात हाल होत होते.
कोट...
पंधरा दिवसांनंतर महावितरण विभागाने रोहित्र बसविल्याने विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व निराधार महिला यांच्या अडचणी दूर झाल्या. तसेच बँकेचेही कामकाज सुरळीत सुरू झाल्याने शेतकऱ्यांची अडचण दूर झाली. ‘लोकमत’ने दखल घेतल्यामुळे समस्या मार्गी लागली.
- कैलास गारे, ग्रामपंचायत सदस्य, सामुंडी
060721\06nsk_29_06072021_13.jpg
पवीन रोहित्र