नाशिकतीन ते चार महिन्यापासून पगार मिळालेला नाही तिकीट चेकरकडून होणारी गंभीर कारवाई अशा विविध प्रश्नांबाबत नाशिक महापालिकेच्या सिटी लिंक या शहर बस वाहतुकीच्या वाहकांनी आज पहाटे पाच वाजेपासून पुकारलेले आंदोलन सुमारे साडे चार तासांनी म्हणजेच साडेनऊ वाजता मागे घेण्यात आले त्यानंतर नाशिक शहरातील बस सेवा सुरळीत झाली.
ऐन गणेशोत्सवात नाशिकमधील सीटी लिंकच्या २०० बसेस बंद, शहर वाहतूक ठप्प; प्रवाशांचे हाल
या वाहकांना अठरा हजार रुपये वेतन देण्याचे सांगण्यात आले होते प्रत्यक्षात दहा हजार रुपये वेतन दिले जाते असा त्यांचा आरोप होता. मात्र व्यवस्थापनाने त्यांचा पगार दहा हजार रुपये असल्याचे दाखवून दिले त्याचप्रमाणे तिकीट चेकरकडून होणारी कारवाई आणि अन्य विषयासंदर्भात सात दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन सिटीलिंकचे उपमहाव्यवस्थापक (वाहतूक) मिलिंद बंड यांनी दिले त्याचप्रमाणे आज दुपारी दोन वाजता नाशिक रोड आणि पंचवटी या दोन्ही आगारातील प्रत्येकी 10 वाहकांना चर्चेसाठी सिटीलींकच्या कार्यालयात बोलविण्यात आले आहे. या चर्चेनंतर या वाहकांनी काम बंद आंदोलन मागे घेतले. गेल्या वर्षी आठ जुलैला नाशिक महापालिकेने सिटी लिंक ही शहर बस वाहतूक सेवा सुरू केली आहे.
वाहन चालवण्याचे आणि वाहक पुरविण्याचे स्वतंत्र कंत्राट देण्यात आले आहे. याशिवाय तिकीट चेकर देखील स्वतंत्र एजन्सी मार्फत नियुक्त करण्यात आले आहे. तिकीट चेकर मनमानी करून वाहकांवर कारवाई करतात असा वाहकांचा आरोप होता. दरम्यान आता वाहतूक सुरळीत झाल्याचं उपमहाव्यवस्थापक मिलिंद बंड यांनी सांगितले.