---
नाशिक : परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक पद मागील चार महिन्यांपासून रिक्त होते. ३० एप्रिलला डॉ. प्रतापराव दिघावकर हे प्रदीर्घ पोलीस सेवेतून या पदावरून निवृत्त झाले तेव्हापासून पोलीस अकादमीच्या संचालक अश्वती दोरजे यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला होता. गृहखात्याकडून सोमवारी (दि.२३) काढण्यात आलेल्या बदली पदस्थापना आदेशानुसार नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस उपमहानिरीक्षकपदी मुंबई गुन्हे शाखेचे अपर आयुक्त बी. जी शेखर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या संचालक अश्वती दोर्जे यांचीही नागपूर शहर पोलीस दलात बदली करण्यात आली आहे.
नाशिक परिक्षेत्रात अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांचाही समावेश होतो. नाशिक परिक्षेत्राची भौगोलिक सीमा अत्यंत मोठी आहे. यामुळे लवकरात लवकर या परिक्षेत्राकरिता पोलीस महानिरीक्षक रिक्तपदी अधिकारी नियुक्त करण्याची मागणी होत होती.
या पदासाठी मकरंद रानडे, सोलापूरचे आयुक्त अंकुश शिंदे आणि मुंबई वाहतूक शाखेचे अतिरिक्त आयुक्त प्रवीणकुमार पडवळ यांच्या नावांची जोरदार चर्चा होत होती तसेच कैसर खालिद यांचेही नाव नंतर चर्चेत पुढे आले होते. मात्र, नाशिकचे महानिरीक्षक पद हे उपमहानिरीक्षक श्रेणीत पदावनत करण्यात आल्याने अपर आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना या पदावर वर्णी देण्यात आली आहे.
तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांची बदली झाल्यानंतर गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात दिघावकर यांनी विशेष पोलीस महानिरीक्षकपदाचा पदभार स्वीकारला होता, त्यांचा सेवाकाळ पूर्ण झाल्याने ते एप्रिल महिन्यात आपल्या मूळ जिल्ह्यातूनच सेवानिवृत्त झाले होते. दिघावकर त्यांनी आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शेतकरी फसवणूक प्रकरणावर भर देणार असल्याचे म्हटले आणि फसवणूक करून पोबारा केलेल्या ''त्या'' व्यापाऱ्यांना रोखठोक इशारा देत मुसक्या बांधल्या होत्या.
दरम्यान, दोर्जे यांच्या पदावर प्रतिक्षाधीन पोलीस अधिकारी राजेशकुमार मोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.