नाशिक : सध्याच्या परिस्थितीत कोरोनाबाबतचे काम करताना मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेऊन राज्य शासनाने ६३५ कर्मचाऱ्यांच्या भरतीला मान्यता दिली आहे. केवळ वैद्यकीयच नव्हे तर अग्निशमन दल, घनकचरा व्यवस्थापन, अभियांत्रिकी, लेखा व लेखा परीक्षण विभागातील ३७ संवर्गातील ही पदे आहेत. या संदर्भातील शासनाचे मान्यता पत्र मनपाला शुक्रवारी (दि. १६) प्राप्त झाल्याची माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. यामुळे महापालिकेला मोठा दिलासा मिळणार आहे. कोरोनाशी लढा देत असताना मनपाला मनुष्यबळ कमी पडत होते. त्यामुळे महापालिकेने शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. परंतु, राज्य शासनाकडून नियमित पद भरतीला मान्यता मिळत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली हेाती. तीन-तीन महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पदांची भरती केली जात असली, तरी केवळ तीन महिन्यांसाठी जीव धोक्यात घालून काम करण्यास कोणीही तयार होत नव्हते. त्यामुळे मुलाखतीसाठी येवूनही नंतर उमेदवार रूजूच होत नव्हते.
मुळात महापालिकेचा आकृतीबंध शासनाकडे गेल्या चार ते पाच वर्षांपासून मंजुरीसाठी पडून आहे. त्यातील किमान वैद्यकीय आणि अग्निशमन दलासह अन्य महत्त्वाच्या विभागातील पदे भरण्यास मान्यता मिळावी, यासाठी आयुक्त कैलास जाधव यांनी पाठपुरावा केला होता. अखेरीस या आकृतीबंधाच्या प्रस्तावातील बाबी विचारात घेऊन व आस्थापनेवर विविध संवर्गातील रिक्त झालेली पदे भरून काढण्यासाठी शासनाने महानगरपालिकेच्या गट - अ ते गट - ड मध्ये आवश्यक असलेल्या पदांचा विभागनिहाय आकृतीबंधातील आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, अभियांत्रिकी विभाग, लेखा व परीक्षण विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग या ५ विभागांतील ३७ संवर्गातील ६३५ पदांना शासनाने परवानगी दिल्याबाबतचा आदेश उपसचिव यांच्या स्वाक्षरीने पारित झाला असल्याची माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. यामुळे मनपाकडे विविध कामे करण्यास मनुष्यबळ उपलब्ध होईल, असेही आयुक्त जाधव यांनी सांगितले.
इन्फो...
राज्य शासनाने कोरोनाच्या संकट काळात ६३५ पदे भरण्यास मान्यता दिल्याने महापालिकेच्या सर्वच संबंधित विभागांची मोठी अडचण दूर होणार आहे. अग्निशमन दलाची अवस्था तर अत्यंत बिकट होती, आपात काळात काम करणे कठीण होत होते. मात्र, आता काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.