अखेर नाशिक महापालिकेत बाप्पा झाले विराजमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 05:04 PM2018-09-13T17:04:57+5:302018-09-13T17:08:23+5:30
विघ्नहर्त्या श्री गणेशाचा उत्सव साजरा करीत असताना शहरातील वीस लाख जनतेला सेवा देण्याची जबाबदारी पाच हजार अधिकारी कर्मचा-यांवर आहे. त्याकडे सकारात्मकदृष्टीने बघितले पाहिजे व शहराच्या विकासासाठी सेवा देण्याचा संकल्प यानिमित्ताने करावा, असे मत यावेळी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केले.
नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रुजू होताच देवदेवतांच्या मूर्ती हटविण्याचे दिलेले आदेश, त्यानंतर गणेश उत्सवावरील नियमावलीचे निर्बंध अशा वातावरणामुळे महापालिका कर्मचाऱ्यांचा गणेशोत्सव यंदा अनिश्चित असताना आयुक्तांनी त्याला परवानगी तर दिलीच, परंतु मेनरोड आणि राजीव गांधी मुख्यालयात दोन्ही ठिकाणी हजेरी लावून पूजा विधीही केल्याने सा-यांनाच सुखद धक्का बसला.
नाशिक महापालिकेच्या वतीने पूर्व विभागीय कार्यालय म्हणजेच मेनरोड येथील उत्सव म्हणजे शहराचा मानाचा पहिला गणपती मानला जातो, तर राजीव गांधी मुख्यालयातही सार्वजनिक गणपती अधिकारी कर्मचारी बसवत असतात. तथापि, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे घेतल्यानंतर मुख्यालयातील विविध प्रकारच्या मूर्ती आणि प्रतिमा हटविण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर त्यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे जाहीर केले तसेच भालेकर मैदान येथे गणेशोत्सवाला परवानगी नाकारल्याने गणेशोत्सवावर विघ्न आल्याची चर्चा सुरू झाली होती. महापालिकेच्या कर्मचाºयांनादेखील गणेशोत्सव साजरा करता येईल किंवा नाही अशी स्थिती निर्माण झाली होती.
मात्र कार्यालयीन वेळेत आणि नागरी कामकाजाला अडथळा येत नसेल तर उत्सव साजरा करण्यास हकरत नाही अशी भूमिका आयुक्तांनी घेतली होती. त्यानुसार कर्मचारी संघटनेने मंडपासाठी परवानगी मागितल्यानंतर त्यांनी परवानगीदेखील घेतली होती. आयुुक्तांनी परवानगी तर दिलीच, परंतु उत्सवात ते सक्रिय सहभागी झाले होते.
पूर्व विभागीय कार्यालय व राजीव गांधी भवन येथे तुकाराम मुंढे यांच्या शुभहस्ते सहपरिवार आरती करून श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली. यावेळी कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, उपआयुक्त महेश बच्छाव, हरिभाऊ फडोळ, आर. एम. बहिरम, संजय नलावडे, मुख्य लेखाधिकारी सुहास शिंदे, गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष संजय घुगे आदींसह खातेप्रमुख अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.