नाशिक : शहर व परिसरात सोमवारी (दि.१) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. नाशिकरोडपासून सर्वदूर सुमारे अडीच ते तीन तास दमदार सरींचा वर्षाव सुरू होता. सायंकाळी साडेपाच वाजेपासून रात्री साडेआठ वाजेपर्यंत ३३ मि.मी इतका तर सकाळपासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत १४.२ मि.मी पावसाची नोंद झाली. एकूणच बारा तासांत ४७.६ मि.मी इतका पाऊस पडला.दोन दिवसांपासून नागरिकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा होती. शहरासह जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये सोमवारी सायंकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. नाशिकरोड परिसरात मात्र दुपारी साडेतीन वाजेपासून पावसाच्या सरींचा वर्षाव होऊ लागला होता. चार वाजेपासून पावसाने जोर धरला.शहरातदेखील साडेचार वाजेपासून जोरदार जलधारा कोसळू लागल्याने रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहू लागले होते. जोरदार पावसाने महापालिका प्रशासनाच्या पावसाळापूर्व तयारीची धूळधाण उडविली. सर्वच गटारी तुडुंब भरून वाहत होत्या. रामायण बंगल्याच्या प्रवेशद्वारासमोर पावसाच्या पाण्याचे तळे साचल्याचे चित्र पुन्हा पहावयास मिळाले. तसेच राजीव गांधी भवनपुढे शरणपूर रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्याचप्रमाणे महात्मा गांधी रोडवरील व्यावसायिक इमारतींच्या तळमजल्यांमध्ये पाणी साचले़ स्टेडियम कॉम्प्लेक्समध्येही पाण्याचे तळे साचले होते़धरण क्षेत्रात पावसाचा दिलासा४सायंकाळी सहा वाजेपर्यंत गंगापूर धरण क्षेत्रात ३८, कश्यपी क्षेत्रात १७, अंबोली पाणलोट क्षेत्रात १७ मि.मी. इतका पाऊस पडला. मात्र गौतमी धरण परिसरात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. त्र्यंबक परिसरातील पाणलोट क्षेत्रात केवळ ७ मि.मी. पावसाची नोंद होऊ शकली. अद्याप गंगापूर धरण क्षेत्रात यापूर्वी पावसाने अशी दमदार हजेरी लावली नव्हती. त्यामुळे सोमवारी धरण क्षेत्राला काहीसा दिलासा मिळाला आहे.वाहतूक कोंडीमुळे हालसाडेपाच वाजेपासून साडेसहा वाजेपर्यंत पावसाचा जोर वाढलेला होता. विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. ऐन सायंकाळच्या वेळेस पावसाच्या दमदार सरींचा जोरदार वर्षाव सुरू झाला. घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. परिणामी कॅनडा कॉर्नर, टिळकवाडी, त्र्यंबक नाका, द्वारका, मुंबई नाका, काठेगल्ली सिग्नल या भागात वाहतुकीची कोंडी झाली होती. रविवार कारंजा परिसरात वाहतूक विस्कळीत झाल्याने मालेगाव स्टॅन्डपासून अहल्यादेवी पुलापर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.
...अखेर जोरदार बरसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 1:27 AM