निकवेल : बागलाण तालुक्यातील निकवेलसह इतर गावांमध्ये ग्रामस्थांना गेल्या दोन महिन्यापासून बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे . गेल्या पंधरवड्यात या भागातील शेत शिवारात रात्री जनावरांवर व शेळीवर बिबट्याने हल्ला करून त्यांचा फडशा पाडण्याच्या घटना समोर आल्याने ग्रामस्थांनी केलेल्या मागणी नुसार वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला आहे. बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील भागात निकववेल, जोरण, कंधाणे , डांगसौंदाणे , दहिंदुले शिवारात घटलेल्या वनसंपदेमुळे व वाढत्या जंगल तोडीमुळे जंगली प्राण्यांनी ग्रामीण भागासह शहराकडे प्रस्थान केले आहे. त्यामुळे या परिसरात अनेकदा मुक्तसंचार करताना बिबट्या नजरेत पडतो . याशिवाय अनेक ठिकाणी बिबट्याने पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याच्या घटना दर आठवड्याला समोर येत होत्या. मळ्यातील जनावरे, शेळी, कुत्रे,व बोकडांचा बिबट्याने फडशा पाडल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे निकवेल, वन कमिटीचे अध्यक्ष विवेक सोनावणे यांनी वन विभागाला वारंवार चर्चा करून पिजरा लावण्याची मागणी केली होती . त्यामुळे वन विभागाने निकवेल शिवारात संतोष व रवींद्र जाधव यांच्या मळ्यात ऊस शेजारी पिंजरा लावण्यात आला . यावेळी वनरक्षक प्रफुल्ल पाटील , दीपक जाधव , शिपाई प्रताप सोनावणे यांनी पिजरा लावला व सोसायटीचे माजी चेअरमन निलेश वाघ , रमेश खैरनार , भूषण जाधव , बंडू वाघ , उपसरंपच मुरलीधर वाघ , दीपक जाधव आदी उपस्थित होते .
...अखेर निकवेल गावात बिबट्यासाठी पिंजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2018 1:11 PM