सिडको : येथील प्रभाग क्रमांक २९ मधील दत्त चौक, पंडितनगर व राजरत्ननगर भागात गेल्या पंधरा दिवसांपासून होत असलेला दूषित व गढूळ पाणीपुरवठा सुरळीत झाला असल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आले आहे, तर याच प्रभागातील महाकाली चौकातील दूषित पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगण्यात आले. सिडकोतील प्रभाग क्र्रमांक २९ मध्ये बहुतांशी ठिकाणच्या ड्रेनेज लाइन या पंधरा ते वीस वर्षांपासून बदलण्यात आलेले नसल्याने त्या जीर्ण होऊन त्यांना गळती लागत आहे. यामुळे ड्रेनेज लाइनला गळती होऊन ड्रेनेजचे पाणी हे पिण्याच्या पाण्यात मिसळत असल्याने नागरकांना दूषित व गढूळ पाणीपुरवठा होतो. यामुळे मनपाने प्रथम गेल्या अनेक वर्षांपासूनच्या जीर्ण झालेल्या ड्रेनेज लाइन बदलणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. प्रभागातील दत्त चौक, पंडितनगर व राजरत्ननगर भागासह महाकाली चौकात गेल्या पंधरा दिवसांपासून दूषित व गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने याबाबत प्रभागाचे नगरसेवक मुकेश शहाणे, नीलेश ठाकरे, छाया देवांग तसेच दिलीप उघडे, भूषण राणे यांनी मनपा अधिकाऱ्यांबरोबर घेत प्रभागात फिरून मनपाच्या संबंधित विभागास पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे सांगितले होते. त्यानुसार मनपाने काही दिवासांपासून दूषित व गढूळ पाणीपुरवठा होत असलेल्या लाइन शोधून तेथील गळती बंद केली. यामुळे दत्त चौक, पंडितनगर व राजरत्ननगर भागातील पाणीपुरवठा सुरुळीत झाला असून, महाकाली चौकातील दूषित पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू असल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आले.
..अखेर दूषित पाणीपुरवठा झाला स्वच्छ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:14 AM