उत्राणे येथील मराठा समाजातील तरु ण प्रवीण कडू पगार हा अपंग होता. गरीब परिस्थितीवर मात करून त्याने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. शासकीय नोकरी मिळावी यासाठी त्याने असंख्य ठिकाणी अर्ज केले; मात्र कुठेही सरकारी नोकरी मिळू शकली नाही. शेती पारंपरिक व्यवसाय सोडून जोडधंदा करावा अशी त्याची इच्छा होती. जोडधंदा सुरू करण्यासाठी आई-वडिलांच्या नावावरील जमिनीवर कर्ज घेण्यासाठी तो एका राष्ट्रीयीकृत बँकेत गत चार महिन्यांपासून चकरा मारीत होता. बँक अधिकारी त्याची हेटाळणी करीत असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. न्याय मिळू शकला नसल्याने त्याने मंगळवारी दुपारी १२ वाजता विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली. मरण्यापूर्वी त्याने लिहून ठेवलेली चिठ्ठी मिळाली आहे. नामपूरचे पोलीस अधिकारी गणेश गुरव, श्रीराम कोळी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह नामपूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. नामपूर परिसरातील मराठा समाजाचे सर्व नेते रु ग्णालयात दाखल झाले होते. शासन जोपर्यंत ठोस आश्वासन देत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला. राष्टवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांनी भाजपा सरकारचा निषेध व्यक्त केला. प्रांताधिकारी प्रवीण महाजन, तहसीलदार जितेंद्र कुवर, पोलीस अधिकारी शशिकांत शिंदे, माजी आमदार संजय चव्हाण, अधिकारी सी. पी. अहिरे यांनी पीडित कुटुंबाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, आमदार दीपिका चव्हाण यांनी भ्रमणध्वनीवरून आश्वासन दिल्याने नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. दुपारी १ वाजता नामपूर ग्रामीण रु ग्णालयाचे डॉ. संदीप पवार व गणेश अहिरे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. दुपारी २ वाजता उत्राणे येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अखेर उत्राणेतील ‘त्या’ तरुणाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 9:07 PM