नाशिक: राज्याच्या आरोग्य शिक्षणाची जबाबदारी सांभाळणारे आरेाग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकस्थित असतानाही, नाशिकमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसल्याने याबाबतची खंत वारंवार व्यक्त केली जात होती. अखेर प्रदीर्घ कालावधीनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, तसेच त्याच्याशी संलग्न ४३० खाटांचे रुग्णालयास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याने नाशिकमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाची स्वप्नपूर्ती झाली आहे.
नाशिकमध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठ आल्यानंतर, प्रत्यक्षात विद्यापीठ स्थिरस्थावर होण्यास सुरुवातीची काही वर्षे गेली. राज्यात आरोग्य शिक्षण आणि संशोधनाच्या बाबतीत विद्यापीठाने वेळोवेळी केलेल्या कामगिरीबरोबरच विद्यापीठाचा विकासही झपाट्याने झाला. त्यामुळे नाशिकमध्येही वैद्यकीय महाविद्यालय असावे, अशी चर्चा सुरू झाली आणि विद्यापीठांचे आजवरचे कुलगुरू, तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री, पालकमंत्र्यांनी यासाठीची पावले उचलली, परंतु नाशिकला महाविद्यालय होण्याची प्रक्रिया अनेकविध कारणांने मागे पडत गेली. दरम्यानच्या काळात धुळे, जळगाव आणि नंदुरबार यांसारख्या जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊ शकले. मात्र, नाशिकचा पाठपुरावा कमी पडल्याने वैद्यकीय महाविद्यालयाची प्रतीक्षा लांबली होती.
गेल्या दहा वर्षांपासून याबाबतच्या प्रयत्नांना आणखी गती देण्यात आली. तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावित, जितेंद्र आव्हाड, गिरीश महाजन यांनी या विषयाला काही प्रमाणात चालना दिल्याने प्रकरण पुढे सरकले. अर्थात, त्यानंतरही नाशिकचा विषय मागे पडून नंदुरबार आणि जळगावमधील वैद्यकीय महाविद्यालय आकारास आले. त्यामुळे नाशिकच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या भवितव्याबाबत चर्चा सुरू होती. नाशिकला वैद्यकीय महाविद्यालय दृष्टिपथात येत नसल्याने, निदान पदव्युत्तर महाविद्यालयाबाबतची चर्चा सुरू झाली आणि संदर्भ सेवा रुग्णालयाला संलग्न पदव्युत्तर शिक्षणासाठीच्या जागा देण्याचे प्रयत्न सुरू झाले.
जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी नाशिकला वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत सरकार सकारात्कमक पावले उचलत असल्याचे संकेत अनेकदा दिले होते. भुजबळ यांनी याबाबातची मागणी सातत्याने केली आणि अखेर बुधवारी (दि.१०) नाशिकच्या वैद्यकीय महाविद्यालयाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
--इन्फो--
विद्यापीठ आवारातच महाविद्यालय शक्य
नाशिकला शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे वैद्यकीय महा विद्यालय, ४३० खाटांचे संलग्नित रुग्णालय आणि ६४ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या नवीन जागा निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी ६२७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. वैद्यकीय महाविद्यालय हे विद्यापीठाच्या आवारातच उभे राहणे शक्य आहे. विद्यापीठाची ५५ एकर जागा असून, वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी २० एकर जागेचा निकष आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या आवारातच महाविद्यालय सुरू होऊ शकते. यासाठी प्रयत्नही होण्याची शक्यता आहे.