नाशिक : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आणि ९४व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाला अवघा आठवडा उरला असताना कार्यक्रमांसह निमंत्रणपत्रिका जाहीर करण्यात आली आहे. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल करण्यात आली असल्याचे दिसून येत आहे.
कालिदास कलामंदिर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर यांनी निमंत्रणपत्रिकेची छोटी आवृत्ती प्रसारमाध्यमांना देऊन या संमेलनातील कार्यक्रमांची माहिती दिली. त्यानुसार संमेलनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे ३ डिसेंबर रोजी ज्येष्ठ वैज्ञानिक साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनास सुरुवात होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि हिंदी चित्रपट गीतकार जावेद अख्तर उपस्थित राहणार आहेत.