नाशिक : दूरचित्रवाहिनीवरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील जेठालालची भूमिका साकारणारे कलावंत दिलीप जोशी यांनी आदिवासी समाजाची माफी मागितल्याने त्यांच्याविरोधातील आंदोलन अखेर मागे घेण्यात आले. आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करीत आदिवासी विकास परिषदेने जेठालाल यांच्याविरोधात विलेपार्ले पेालिसात धाव घेतली होती.
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली शिष्टमंडळाने तारक मेहता का उलटा चष्मामधील जेठालालची भूमिका करणारे कलावंत दिलीप जोशी यांच्या विरोधात पोलिसांना तक्रार अर्ज दिला होता. २०१६मधील या मालिकेतील एका भागात आदिवासी समाजाविषयी केलेल्या विधानामुळे समाजाच्या भावना दुखावल्याचे निवेदनात म्हटले आहे. याप्रकरणी कलावंत दिलीप जोशी आणि मालिकेतेच संवाद लेखक यांच्यावर कारवाई करण्यात यावी, त्यांनी समाजाची माफी मागावी, यासाठी मुंबईत जाऊन पोलिसांची भेट घेतली.
विलेपार्ले पोलिस स्टेशन येथे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नार्वेकर, एपीआय यादव, मोरे यांना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष जाधव यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन दिले. दिलीप जोशी यांनी आदिवासींचा ‘अमावासी’ असा उल्लेख केल्याचा व्हिडीओ पोलिसांना दाखविला. यामुळे तमाम आदिवासींच्या भावना दुखावल्या असल्याने जेठालाल यांच्यावर अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांना पोलिस स्टेशनला बोलावून माफी मागावी आणि स्क्रिप्ट लेखकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. पोलिसांनी जोशी यांना पोलिस ठाण्यात बोलावून घेतल्यानंतर परिषदेचे पदाधिकारी आणि जोशी यांच्यात चर्चा झाली. जोशी यांनी तमाम आदिवासींची लेखी व व्हिडीओद्वारे माफी मागितली, असे लकी जाधव यांनी सांगितले. शिष्टमंडळात परिषदेचे विक्रम पाडवी, बिरसा मुकणे, मोहन खाडे, रामेश्वर भोये, जयदेव गोडे, किरण निंबेकर, पालघर जिल्हाध्यक्ष रामदास हरवटे, गोपाळ गांगुर्डे, राहुल गावित, तुषार गावित, आशुतोषबरफ, मुकेश पडोसा, राजेश शालकर, प्रमोद वाढाण, संजय फरले, रवी गावित आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.