गंगापूर : दोन दिवसांपूर्वी एका शेतकऱ्यावर हल्ला करून जखमी करणारा बिबट्या अखेर सोमवारी (दि.११) पहाटे पिंजºयात अडकला. गिरणारे शिवारातील नाईकवाडी रस्त्यावरील रानवस्तीवर वनविभागाकडून लावण्या आलेल्या पिंजºयात बिबट्या जेरबंद करण्यास यश आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. जेरबंद झालेला बिबट्या पाच वर्षांची मादी असल्याचे सूत्रांनी सांगितले.गिरणारे गावाजवळील रानवस्तीतील नाईकवाडी रस्त्यावरील नागटेंभी येथे शेतात आपल्या मुलासोबत दुपारच्या सुमारास काम करत असताना बिबट्याने अचानकपणे शेतकरी दीपक पिंगळे यांच्यावर हल्ला करून जखमी केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेनंतर गिरणारे, नागटेंभी, गंगाम्हाळुंगी या शिवारातील नागरिक दहशतीखाली आले होते. नागरिकांनी शेतात दैनंदिन कामांसाठी जाणेही सोडले होते. वनविभागाने या भागात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यानंतर शनिवारी संध्याकाळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पिंगळे वस्तीच्या परिसरात पिंजरा लावला. या पिंजºयात सोमवारी पहाटेच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात भटकंती करणारी बिबट मादी अडकली.पिंजºयात अडकल्यानंतर बिबटमादीने डरकाळी फोडल्याने परिसरातील रहिवाशांच्या लक्षात आले. परिसरातील मेंढपाळांनी ताबडतोब ही बाब वनविभागाच्या कर्मचाºयांना कळविली. यावेळी बघ्यांनी बिबट्याला बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे पिंजºयात अडकलेला बिबट्याही आक्रमक होऊन चवताळून सुटकेचा प्रयत्न करताना दिसून आला. यावेळी वनपरिमंडळ अधिकारी एस. एन. हांबरे, वनरक्षक वर्षा पाटील, एस. एस. चव्हाण आदींनी घटनास्थळी दाखल होऊन तत्काळ बिबट्यासह पिंजरा वनविभागाच्या रेस्क्यू व्हॅनमधून घटनास्थळावरून हलविला.बिबट्याची दहशत कायमगिरणारे, महादेवपूर, मखमलाबाद, मातोरी, साडगाव, नाईकवाडी, चांदशी, गंगावºहे भागात मागील अनेक दिवसांपासून बिबट्याचे नागरिकांना दर्शन घडत होते. यामुळे या भागातील शेतकरी धास्तावलेले होते. या भागात दुसराही बिबट्याचा वावर असण्याची शक्यता नागरिकांनी वर्तविली असून पिंजरे वाढविण्याची मागणी केली आहे.
...अखेर बिबट्या अडकला पिंजऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 12:26 AM