नाशिक- शहरातील विविध वास्तु चौक आणि रस्त्यांना नावे देण्यासाठी नियुक्त करण्यासाठी असलेल्या महापालिकेच्या नामकरण समितीची बैठक मंगळवारी (दि.१४) होणार असून यावेळी सुमारे दीडशे प्रस्तावांचा फैसला होणार आहे.
शहरातील विविध चौक, रस्ते आणि मिळकतींना राष्टÑ पुरूष संत आणि काही वेळा स्थानिक स्तरावरील व्यक्तींची नावे दिली जातात. परंतु अशी नावे देण्यासाठी महापालिकेकडे नगरसेवकांमार्फत अर्ज केल्यानंतर महापौरांच्या अध्यक्षतेखालील नामकरण समितीकडे पाठवली जातात. या समितीत एखाद्या वास्तुला नाव देण्याचा निर्णय झाला तरी यापूर्वी अनेकदा नामकरण वादात सापडत असल्याने प्रस्तावांवर हरकती आणि सूचना मागवल्या जातात त्यानंतरच निर्णय अंतिम केला जातो.
गेल्या अडीच तीन वर्षात या समितीची केवळ एकदाच बैठक झाली आहे. विधान सभा निवडणूकीपूर्वी तत्कालीन महापौर रंजना भानसी यांनी घाईघाईने बैठक घेऊन दोन ते तीन नामकरणाचे तातडीने विषय मंजुरी दिली. परंतु त्यानंतर मात्र कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आता महापौर सतीश कुलकर्णी यांनी बैठक बोलावली असून मंगळवारी (दि.१४) दुपारी प्रस्तावांबाबत निर्णय घेतले जाणार आहे.