संजय पाठक
नाशिक : शहरातील सर्वात मजबूत रोड मानल्या जाणाऱ्या एमजी रोडवर खोदकाम करून पावसाळी गटारी आणि तत्सम कामे करण्यास आयुक्त कैलास जाधव यांनी स्थगिती दिली आहे. यासंदर्भात आयुक्तांनी सोमवारी (दि. १३) कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आणि ठेकेदार कंपनीस प्रत्यक्ष बोलावून सूचित केल्याचे वृत्त आहे. तसेच एमजीरोडवर यापूर्वी पावसाळी गटारी तसेच सर्व्हिस लाइन टाकण्याची व्यवस्था अगोदरच केली असल्यास त्याची शहनिशा करावी, अशी सूचनाही आयुक्तांनी केली आहे.
स्मार्ट सिटीच्या स्मार्ट रोडवरून सुरू झालेला वादग्रस्त खोदकामाचा सिलसिला सुरूच असून, आता तो गावठाणात सुरू आहे. भरपावसाळ्यात अशाप्रकारची कामे सुरू असल्याने अगोदरच गावठाणातील नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषत: गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे बाजारपेठा पूर्णत: उघडल्या जात नाहीत. त्यातच आता जरा कुठे बाजारपेठा सुरू होत असताना गावठाणातील रस्ते खोदण्यात येत आहेत. त्यातच रस्त्याच्या नव्या डिझाइननुसार ते आणखी खोल करण्यात येत आहेत. चांगले रस्ते खोदण्याचे काम सुरू असतानाच आता कंपनीच्या वतीने शहरातील सर्वांत चांगला मानला जाणारा महात्मा गांधी रोड फोडण्यास प्रारंभ झाला आहे.
१९९२ साली निविदा मागवून तयार करण्यात आलेला मेहेर ते महाबळ चौक हा शहरातील सर्वात पहिला ट्रिमिक्स काँक्रिट रोड आहे. ३५ लाख रुपयांत तयार झालेल्या या रस्त्यावर आजपर्यंत एक खड्डाही पडलेला नाही, की या मार्गावर पाणीही साचलेले नाही. मात्र आधी पावसाळी गटार आणि नंतर सर्व्हिस लाइनसाठी रस्त्याच्या बाजूने खोदकाम करण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण स्मार्ट सिटी कंपनीकडून दिले जात आहे. विशेष म्हणजे या रस्त्यावर दर तीस मीटर अंतरावर अशाप्रकारच्या भूमिगत लाइन्स टाकण्याची सोय अगोदरच आहे, अशी माहिती महापालिकेेेचे जुने अभियंता आणि रस्ता तयार करणारे तत्कालीन कंत्राटदार शिवनाथ कडभाने यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर आता फुटपाथसाठी खोदकाम करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते. साेमवारी (दि.१३) महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी कंपनीचे सीईओ सुमंत माेरे, सध्या खोदाकाम करीत असलेल्या ठेकेदार कंपनीचे अधिकारी आणि शहर अभियंता संजय घुगे यांना पाचारण करून माहिती घेतली आणि एमजी रोडसह सर्वच ठिकाणी खोदकाम थांबवण्याच्या तोंडी सूचना केल्या आहेत.
इन्फो...
मनपाच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मे महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व प्रकारचे खोदकाम पूर्ण करून नवीन खोदकाम करू नये, असे आदेश महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिले होते. ते मे महिन्यातच स्मार्ट सिटी कंपनीलाही देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही कंपनीचे खाेदकाम थांबतच नसल्याचा प्रकार आयुक्तांसमोर सोमवारी उघड झाला.