----
नाशिक : आनंदवलीतील मोक्याचा भूखंड गिळंकृत करण्यासाठी भूमाफियांनी एका होमगार्डला भूधारक वृद्धाच्या खुनाची सुपारी देत निर्घृणपणे फेब्रुवारी महिन्यात काटा काढला होता. या खूनप्रकरणी पोलीस आयुक्तांनी भूमाफिया टोळीचा म्होरक्या संशयित रम्मी राजपूतसह १९ संशयितांच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियमअंतर्गत (मकोका) गुरुवारी (दि.६) कारवाई केली आहे.
गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील आनंदवलीत १७ फेब्रुवारी रोजी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कट रचून भूमाफियांनी भूधारक रमेश वाळू मंडलिक (70) यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती.
या घटनेने संपूर्ण शहर हादरले होते. दस्तुरखुद्द दीपक पांडेय यांनी या गुन्ह्यच्या तपासात लक्ष घालून पोलीस ठाण्यात सलग तीन दिवस तळ ठोकत घटनास्थळी भेट देऊन तपासाला वेळोवेळी दिशा दिली. या खुनाच्या घटनेत भूमाफियांनी कट रचल्याचे समोर आल्याने त्यांनी या टोळीचा पर्दाफाश केला होता.
आनंदवलीतील मंडलिक यांची हत्या वरवर जमीन वादातून झालेली आहे, असे सुरुवातीला भासवण्यात आले होते. हत्या करणारा आरोपी हा सुद्धा भाडोत्री होता. त्यामुळे फारसे प्रत्यक्ष पुरावे पोलिसांच्या हाती लागलेले नव्हते. उपायुक्त अमोल तांबे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल आणि त्यांच्या पथकाने पुराव्यांची साखळी जोडून या गुन्ह्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या तब्बल डझनभर संशयितांना समोर आणले.. यापैकी दहा संशयितांना बेड्याही ठोकल्या.
शहरात वाढती भूमाफियांची गुन्हेगारी आणि संघटितपध्दतीने त्यासाठी आखले जाणारे षडयंत्र रचले जात असल्याचे निष्पन्न झाले. भूमाफियांची शहराच्या जमिनीत खोलवर रुजणारी पाळेमुळे उखडून फेकण्यासाठी पांडेय यांनी कंबर कसली.
त्यामुळे या टोळीचा म्होरक्या रम्मी राजपूतच्या टोळीविरोधात मोक्कानुसार कारवाई केली. पांडेय यांनी घटना घडल्यानंतर फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यातच मोक्कानुसार कारवाई करण्याचा इशारा दिला होता.
गंगापूर पोलिस ठाण्याने प्रस्ताव तयार करत त्यांची ''कुंडली'' काढली. टोळीतील संशयितांवर गंभीर गुन्हे दाखल असल्याने अखेर पांडेय यांनी मकोका प्रस्तावास मंजुरी दिली. या वर्षातील ही तिसऱ्या मोठ्या टोळीभोवती मकोका कायद्याचा फास आवळण्यात आला असून अशाप्रकारे ही चौथी कारवाई आहे.
-----इन्फो---
या टोळीभोवती मोक्काचा आवळला फास
गुन्ह्याचा मास्टर माइंड हा रम्मी राजपूत असल्याचे पोलिसांनी सांगितले गुन्हा घडल्यापासून रो फरार आहे. त्याच्या टोळीतील सचिन त्र्यंबक मंडलिक, अक्षय जयराम मंडलिक, भूषण भीमराज मोटकरी, सोमनाथ काशिनाथ मंडलिक, दत्तात्रय काशिनाथ मंडलिक, नितीन पोपट खैर, आबासाहेब पाराजी भडांगे, भगवान बाळू चांगले, बाळासाहेब बारकू कोल्हे, गणेश भाउसाहेब काळे, सागर शिवाजी ठाकरे, वैभव अनिल वराडे, नगदीश अंबक मंडलीक, रम्मी परमजिसिंग राजपूत, मुक्ता एकनाथ मोटकरी, गोकूळ काशिनाथ आव्हाड, अमोल हरिभाऊ कालेकर, सिध्देश्वर रामदास आंडे, दत्तात्रय अरुण सुरवाडे, नारायण गोविंद बेंडकुळे यांचे विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम कायद्यान्वये आदेश पारित करून कारवाई करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक आयुक्त समीर शेख हे करत आहेत.
-----कोट-----
जेव्हा मंडलिक खुनाचा गुन्हा घडला तेव्हा प्रथमदर्शनी हा गुन्हा भाऊबंदकीच्या वादातून घडला असावा असे वाटत होते किंबहुना तसे भूमाफियांनी भासविण्याचा प्रयत्न केला होता मात्र गुन्ह्याच्या तपासात विविध बाबी पुढे आल्या. संशयित गुन्हेगारांच्या चौकशीतूनही काही महत्त्वाची माहिती हाती आली. त्यानुसार तपासाला गती देण्याचे आदेश दिले. १० संशयित गुन्हेगार यामध्ये अटक करण्यात आले आहे. फरार रम्मी राजपूत व त्याच्या एका साथीदारालाही लवकरच अटक केली जाईल.
भूमाफियांना दहशत आता खपवून घेतली जाणार नाही. यापुढे जर गुन्ह्यात सहभाग आढळल्यास थेट झोपडपट्टीदादा कायद्यानुसार (एमपीडीए) कारवाई करण्यात येईल.
- दीपक पांडेय, पोलीस आयुक्त