नाशिक : मेहेर सिग्नल ते अशोक स्तंभपर्यंत राणी लक्ष्मीबाई भवनसमोरील रस्ता रविवारी सायंकाळी ६ वाजून ४१ मिनिटाला खुला करण्यात आला. ‘स्मार्र्टसिटी’कं पनीकडून मुदतवाढ संपूनदेखील ‘मार्ग’ मोकळा केला जात नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. अखेर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चतुर्थीच्या पुर्वसंध्येला हा रस्ता खुला झाल्यामुळे ‘विघ्न’ टळल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मेहेर सिग्नल ते अशोकस्तंभपर्यंतचा रस्ता पहिल्या टप्प्यातील असून या रस्त्याची मुदतवाढ मार्चमध्येच संपली आहे. तेव्हापासून रस्ता पुर्ण होईपर्यंत संबंधित ठेकेदाराकडून दंड वसूल केला जाणार आहे. दरम्यान, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, स्मार्टसिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थवील, व्यवस्थापक विश्राम पाटील यांच्या पथकाने काही दिवसांपुर्वीच मेहेर सिग्नल ते अशोक स्तंभपर्यंत रस्त्याच्या एका बाजूच्या कामाची पाहणी केली होती. यावेळी ३१ आॅगस्टपर्यंत रस्ता खुला करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली होती. मात्र या रस्त्याचे काम पुर्ण होऊ शकले नाही, त्यामुळे हा रस्ता रविवारी सायंकाळपर्यंत खुला केला जाणार असल्याचे सांगण्यात आले होते.
...अखेर ‘विघ्न’ हटले; मेहेर ते अशोकस्तंभ रस्ता खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2019 7:32 PM