नाशिक : जुने नाशिक परिसरातील प्रभाग क्रमांक १४ मधील शहीद अब्दुल हमीद चौकाला मागील सहा वर्षांपासून नामफलकाची प्रतीक्षा होती. महापालिका प्रशासनाकडे वारंवार मागणीही केली जात असताना मात्र महापालिकेला मुहूर्त मिळत नसल्याने अखेर यावर्षी हेलबावडी परिसरातील सय्यद हमदान शहा समितीने पुढाकार घेत शहिदांच्या नावाने असलेल्या चौकाची उपेक्षा नामफलक उभारून थांबविली. सहा वर्षांपूर्वी येथील रस्ते विकासकामादरम्यान, महापालिकेचा जुना नामफलक संबंधितांनी काढला; मात्र पुन्हा फलक बसविण्याची तसदीदेखील घेतली गेली नाही. शहरात महापालिकेने सर्वत्र नवीन फलक उभारण्याची मोहीम पार पाडली; मात्र भारतीय सैन्यदलातील शहीद अब्दुल हमीद यांचे नाव ज्या चौकाला दिले गेले आहे, त्या चौकात नामफलक लावून स्मृती जपण्याचा साधा प्रयत्नदेखील महापालिकेने केला नाही, हे विशेष! सहा वर्षांचा कालावधी उलटूनदेखील महापालिकेला फलक लावण्याचा मुहूर्त मिळत नसल्याने येथील समितीच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत स्वत: पुढाकार घेत आपापसांत वर्गणी गोळा करून या चौकात ‘शहीद अब्दुल हमीद’ यांचा नामफलक उभारला. स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर या नव्या फलकाचे अनावरण करण्यात आले.‘लोकमत’च्या पाठपुराव्याने नागरिकांमध्ये जागृतीशहीद अब्दुल हमीद यांच्या नावाने ओळखला जाणारा चौक नामफलकविना असल्याने, शहीद चौकाची उपेक्षा होत होती, याबाबत ‘लोकमत’ने मागील वर्षी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर १३ आॅगस्ट रोजी सचित्र वृत्त प्रसिद्ध केले होते. तसेच २०१६ साली १० सप्टेंबर रोजी अब्दुल हमीद यांच्या स्मृतिदिनी विशेष वृत्त प्रसिद्ध करून महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. सातत्याने लोकमतने याबाबत पाठपुरावा सुरू ठेवला असला तरी महापालिक ा प्रशासनाला जाग आली नाही; मात्र नागरिकांमध्ये जनजागृती झाली.१९६५च्या भारत-पाक युद्धात वीरमरण आलेले अब्दुल हमीद यांना भारत सरकारने मरणोत्तर परमवीरचक्राने सन्मानित केले आहे. अब्दुल हमीद यांनी पळकुट्या पाकिस्तान सैन्याचा पाठलाग करून केवळ ‘गन माउंटेड जीप’च्या सहाय्याने पाकिस्तान सैन्याचे ‘अमेरिकन पॅटर्न टॅँक’ उद्ध्वस्त केले होते. यावेळी एक बॉम्बगोळा त्यांच्या जीपवर आदळल्याने अब्दुल हमीद जखमी झाले होते. १० सप्टेंबर १९६५ साली त्यांना वीरमरण आले.
...अखेर शहीद अब्दुल हमीद चौकाची उपेक्षा थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 12:56 AM