नाशिक - महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री दादा भुसे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हा व्हिडिओ शेअर करत प्रश्न उपस्थित केला आहे. व्हिडिओमध्ये नाशिकचे पालकमंत्री असलेले दादा भुसे एका तरुणाला चापट मारताना आणि शिव्या देताना दिसत आहेत. आता, माध्यमांतील टीकेनंतर आणि विधानसभेत पत्रकारांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी हा मुद्दा उचलून धरल्यानंतर दादा भुसेंनी व्हिडिओबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
मालेगाव येथील शिवपुराण कथेच्या कार्यक्रमाचा आयोजन २३ डिसेंबरपासून सुरू आहे. दररोज २ ते ३ लाख भाविक येतात, अंदाजे ७५ ते ८० टक्के महिला भगिनी या कथेचं श्रवण करतात. त्या कार्यक्रमस्थळी या दोघांनी अतिशय चुकीचं कृत्य केलं होतं, जे की समाजातील नागरिक त्याच समर्थन करु शकत नाही. त्यावेळी, तिथे मोठा मॉबही जमला होता. मग, मी पोलिसांना संबंधितांवर कारवाईचे आदेशही दिले आहेत. मी त्या क्षणाला तसं केलं नसतं तर, त्या मॉबच्या भावना तीव्र होत्या, खूप मोठा प्रसंग तिथे निर्माण झाला असता. मात्र, किरकोळ घटनेतून आम्ही तो प्रसंग मार्गी लावला आहे, असे स्पष्टीकरण दादा भुसे यांनी दिले. तसेच, जितेंद्र आव्हाड यांनी माहिती घ्यावी, माहिती घेतल्यानंतर तेही सर्वकाही मान्य करतील, असेही मंत्री भुसे यांनी म्हटलं.
जितेंद्र आव्हाड यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत काही सवाल उपस्थित केले आहेत. दादा भुसेंवर कारवाई करण्याचा संदर्भ देत आव्हाड यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले आहे. आपल्या ट्विटमध्ये आव्हाड म्हणतात, ''मंत्री दादा भूसे फटकावतात. शिव्या देतात. मुख्यमंत्री साहेब, कुठला गुन्हा पोलिस घेणार? पोलिसांसमोर मारले. माझा नग्न फोटो fb वर टाकणाऱ्याला आपण मांडीवर बसवलत, #सीबीआय चौकशी लागावी म्हणून वकिलांची फौझ उभी केलीत. सुप्रीम कोर्टामध्ये रात्री त्या विकृताबरोबर आपली बैठक, आता बोला..'' असे ट्विट आव्हाड यांनी केले आहे.
व्हिडिओमध्ये नेमकं काय?
मालेगाव शहरात महाशिवपुराण कथेचे आयोजन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले आहे. ही कथा ऐकण्यासाठी लाखों भाविकांची गर्दी होत आहे. गर्दीमध्ये काही चोरट्यांनी पाकीटमारी आणि महिलांचे दागिने चोरण्याचा प्रयत्न केला, पण दोघा संशयितांना पोलिसांनी पकडले. यातील एकाला दादा भुसे यांनी आधीच्या दिवशीच पोलीसांच्या ताब्यात देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तोच चोर बस स्थानक परिसरात आढळून आल्याने दादा भुसे तिथे पोहचले होते. यावेळी आक्रमक झालेल्या दादा भुसे यांनी थेट दोघा तरुणांचे फोटो काढा म्हणत शिवीगाळ केली, त्यात एकच्या श्रीमुखातही भडकवली. यावेळी बाजूलाच पोलिसही उपस्थित होते. पोलिसांसमोर दादा भुसे यांनी त्या व्यक्तीला मारहाण आणि शिवीगाळ केल्यामुळे आव्हाड यांनी प्रश्न उपस्थित केला. विशेष म्हणजे, यापूर्वीही दादा भुसे यांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.