नाशिक : मिशन ऑल आउट, रात्रीचे कोम्बिंग ऑपरेशन, लेट नाइट फिक्स नाकाबंदी, यासारख्या मोहिमा जणू बंद झाल्या होत्या. यामुळे शहरात गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले. जणू शहरातून पोलिसांचे अस्तित्व गायब झाल्याचे समजून गुन्हेगारांनी ‘खाकी’ला आव्हान दिले. कोरोनाचा निर्बंध शिथिल झाल्यानंतर पहिल्यांदाच नाशिककरांनी मंगळवारी(दि. १३) रात्री उशिरा चौकाचौकांत पोलिसांची नाकाबंदी अनुभवली.
खून, खुनाचा प्रयत्न, जबरी लूट, सशस्त्र हल्ले, घरफोड्या, वाहन चोरी यांसारख्या गुन्ह्यांनी नाशिक शहरामध्ये कळस गाठला असताना नाशिक पोलीस रस्त्यावर का उतरत नाहीत, असा सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून केला जात होता. शहरातून पोलिसांचे अस्तित्व गायब झाले की काय, या आविर्भावात गुन्हेगार मोकाट गुन्हे करत नागरिकांना वेठीस धरत होते. यामुळे पोलिसांच्याही कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन निशान ऑल आउट फिक्स पॉइंट नाकाबंदी यांसारखी मूळ पोलिसिंग पुन्हा सुरू करण्याची मागणी तीव्र झाली असताना, अखेर या मोहिमांचा एक भाग असलेल्या ‘नाकाबंदी’चा मुहूर्त पोलिसांना मंगळवारी रात्री गवसला आणि नऊ वाजेच्या ठोक्यावर शहरातील भद्रकाली, पंचवटी, मुंबईनाका, सरकारवाडा, इंदिरानगर, गंगापूर, सातपूर, उपनगर आदी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलीस रस्त्यावर उतरले. दोन्ही परिमंडळात पोलिसांकडून सर्व उपनगरांमध्ये महत्त्वाच्या चौकांत पोलिसांचा फौजफाटा तैनात केला. संशयित दुचाकीचालक, चारचाकी चालकांना थांबवून पोलिसांकडून चौकशी केली जात असल्याचे यावेळी दिसून आले. अचानकपणे शहरासह उपनगरांमध्येसुद्धा अचानकपणे पोलीस रस्त्यावर उतरल्यावर नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तसेच टवाळखोर, गुंड प्रवृत्तीच्या लोकांचे धाबे दणाणले. या मोहिमेत पोलीस ठाण्यांचे अधिकारी, कर्मचारी व गुन्हे शाखा तीनही युनिटचे साध्या वेशातील अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. रात्रीचे चालणारे अवैध धंदे, जुगार अड्डे यावेळी धाड टाकण्यात आली. सराईत गुन्हेगारांच्या ठावठिकाणांचा) शोध घेण्यात आला. अवैधरीत्या शस्त्र बाळगणाऱ्यांनाही शोधून काढण्याचा प्रयत्न केला गेला. बहुतांश गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांना वॉरंट बजावण्यात आले. रात्री नऊ ते बारा वाजेपर्यंत ऑल आउट मोहीम राबविण्यात आली.