याबाबत ग्रामीण पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शहरातील कॉलेज रोड भागात राहणारे दंडगव्हाळ हे त्यांच्या कामानिमित्त मित्राची ॲसेंट कार (एमएच १५ ईपी १४३४) घेऊन ठाणे येथे गुरुवारी (दि.२५) येथे गेले होते. कामकाज आटोपून नाशिककडे परतत असताना त्यांनी जेवणासाठी रायगडनगर येथे वाहन थांबविले. जेवण आटोपून पुन्हा नाशिककडे येत असताना दुचाकीने आलेल्या अज्ञात दोघा हल्लेखोरांनी पिस्तुलमधून त्यांच्या वाहनावर गोळ्या झाडल्याची फिर्याद त्यांनी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात दिली. पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर अधीक्षक शर्मिला वालावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेला सखोल तपास करत तातडीने गुन्ह्याचा छडा लावण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे, समीर अहिरराव, अनिल वाघ, नवनाथ गुरुळे, हेमंत गिलबिले, रवींद्र वानखेडे आदींच्या पथकाने तपासाला गती दिली. संशयावरून स्वप्निल यांना प्रथम चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. यावेळी घटनाक्रम आणि त्यांनी सांगितलेली हकीगत यामध्ये तफावत आढळून आली. यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला. स्वप्निल यास पोलिसांनी ‘खाक्या’ दाखवत कसून चौकशी केली असत, त्याने गुन्ह्याची कबुली देत स्वत: रात्री दीड वाजेच्या सुमारास कारच्या काचेवर गोळीबार केल्याचे सांगून या नाट्याचा प्रयोग संपविला.
---इन्फो---
‘गोळीबार’मधील सहकलाकारही ताब्यात
कर्जबाजारी झाल्याने स्वप्निलकडे पैशांसाठी लोक तगादा लावत हाेते. यामधून सुटका करून घेण्यासाठी स्वप्निलने स्वत:कडील बेकायदा पिस्तूलमधून वाहनावर गोळीबार केला आणि प्राणघातक हल्ला झाल्याचा बनाव रचला. संशयित स्वप्निल यास या ‘गोळीबार’नाट्यात साथ देणारे संशयित केशव संजय पोतदार (२५, रा. सिध्दिविनायक सोसा. इंदिरानगर) व रौनक दीपक हिंगणे (३१, रा. गुरुद्वारा रोड, शिंगाडा तलाव) आणि आसिफ आमिन कादरी (३५, रा. मोठा राजवाडा, जुने नाशिक) यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील केशव आणि रौनक यांना घटनास्थळी बोलावून स्वप्निल याने गुन्ह्यात वापरलेले बेकायदा पिस्तूल दिले. तर केशव याने हे पिस्तूल लपविण्यासाठी आसिफकडे दिल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. या तिघांविरुध्द गुन्हा दाखल करून त्यांना पुढील तपासाकरिता वाडीवऱ्हे पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.