नाशिक : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना अखेर येत्या १ एप्रिलपासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार असून त्यासंदर्भातील आदेश प्रशासनाने जारी केले. ४ हजार ६७३ कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होणार असून महापालिकेच्या वार्षिक वेतनखर्चावर निवृत्ती वेतनाच्या खर्चासह ६५ कोटी रुपयांचा भार पडणार आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार समकक्ष वेतन देण्यावरून वर्षभर हा मुद्दा गाजला असला तरी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर पे प्रोटेक्शन देण्यात आल्याने एकाही कर्मचाऱ्याचे वेतन एक रुपयाने देखील कमी हेाणार नाही.
महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी यासंदर्भात शुक्रवारी (दि. ५) आदेश निर्गमित केले आहेत. राज्य शासनाच्या आदेशानुसार १ जानेवारी २०१६ पासूनच हा वेतन आयोग लागू करण्यात आला असला तरी त्याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून करण्यात येणार आहे, असे प्रशासन उपआयुक्त मनोज घोडे-पाटील यांनी सांगितले. महापालिकेला सध्या वेतनासाठी वार्षिक २४५ कोटी रुपये खर्च येतो. त्यात आता ५० कोटी ६४ कोटी वाढ होणार आहे. निवृत्ती वेतनासाठी मासिक २० कोटी ४१ लाख रुपये खर्च असून त्यात ५ कोटी २३ लाख रुपये म्हणजेच एकूण २५ कोटी ६४ लाख रुपयांची वाढ होणार आहे. सध्या निवृत्ती वेतनावर वार्षिक ६२ कोटी ८८ लाख रुपये खर्च होतात. त्यात वाषिॅक १४ कोटी २८ लाख रुपयांचा बोजा पडेल. त्यामुळे नियमित वेतन आणि सेवानिवृत्ती वेतनाचा विचार करता वार्षिक ६५ कोटी रुपयांचा भार वाढणार आहे.
महापालिकेत ४ हजार ६७३ कर्मचारी असून त्यांना वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी कर्मचारी संघटना आणि सर्वपक्षीय नगरसेवक आग्रही होते. मात्र, राज्य शासनाने महापालिकांना वेतन आयोग लागू करताना शासकीय पद समकक्षच वेतन देण्यात येईल, असे नमूद केले असल्याने अनेक कर्मचाऱ्यांचे वेतन कमी होण्याची भीती होती. त्यामुळेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर पे प्रेाटेक्शनची मागणी करण्यात आल्यानंतर त्यानुसार आयुक्तांनी नियुक्त केलेल्या समितीने गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून बैठका घेऊन अखेरीस सातव्या वेतनश्रेणीनुसार नव्याने वेतनश्रेणी निश्चित केल्या. महापालिकेत १८६ संवर्ग असून त्यातील पाच संवर्ग हे शासकीय प्रतिनियुक्तीवर आहेत. उर्वरित संवर्गापैकी १३ संवर्गात वेतनश्रेणी मान्यतेसाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. उर्वरीत कर्मचाऱ्यांना मात्र वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे. महापालिका कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करण्यासाठी मुख्य लेखापाल महाजन, लेखापरीक्षक किरण सोनकांबळे, अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाण, करसंकलन उपआयुक्त प्रदीप चौधरी आणि प्रशासन उपआयुक्त मनोज घोडे-पाटील यांची चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे.
इन्फो...
एकूण मनपा कर्मचारी ४६७३
वेतनाचा एकूण होणारा वार्षिक खर्च २४५ कोटी
१ एप्रिलपासून वाढणारा खर्च ५० कोटी ६४ लाख
इन्फो...
महापालिकेला १ जानेवारी २०१६ पासून फेब्रुवारी अखेरपर्यंत नियमित स्थायी कर्मचाऱ्यांचे वेतनापोटी २०६ कोटी ५४ लाख, तर निवृत्ती वेतनापोटी ६६ काेटी ८७ लाख असे एकूण २७३ कोटी ४१ लाख रुपये अदा करावे लागणार आहेत. त्याबाबत स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहे.
इन्फो...
अभियंता मात्र रखडले
तांत्रिक पदे आणि न्यायप्रविष्ट बाब यामुळे अभियंत्यांच्या वेतनश्रेणीसाठी शासनमान्यता घ्यावी लागणार असून तसा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कालिदास कलामंदिर आणि जलतरण तलाव यासह काहीपदे ही शासकीय आस्थापनेवरदेखील नाहीत. त्यामुळे त्यांच्या वेतनश्रेणीसाठीही शासनाकडून मान्यता घेण्यात येणार आहे.