नाशिक शहरात कोरोना बाधितांची संख्या आता कमी होऊ लागली असली तरी गेले महिनाभर कहर होता. रूग्णांना ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने त्यांचे प्रचंड हाल झाले. एकेका बेडसाठी रूग्णांना रूग्णवाहिकेत बसवून भ्रमंती करावी लागली तर दुसरीकडे काहींचा मृत्यू देखील झाला होता. दरम्यान, या प्रकारानंतर नाशिक महापालिकेने नगरसेवक निधीतून ऑक्सिजन कॉन्सट्रेटर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार साडे बाराशे ऑक्सिजन कॉन्सट्रेटर खरेदी करण्यासाठी महापालिकेने तयारी केली. सर्व नगरसेवकांचा स्वेच्छाधिकार निधी त्यासाठी वर्ग करण्यात आला आणि १२५० कॉन्सट्रेटर खरेदीची ऑर्डर गेल्या महिन्यात देण्यात आली. कोरियातून हे कॉन्सट्रेटर येण्यास विलंब झाला असला तरी गेल्या आठवड्याच्या अखेरीस ते विमानतळावर दाखल झाले. कस्टम क्लियरन्सनंतर ते नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.
सध्या या कॉन्सट्रेटरची नोंदणी आणि लेबल लावण्याचे काम सुरू असून त्यानंतर ते नगरसेवकांना वितरित करण्यात येणार आहे. यापूर्वी महापालिकेने शंभर कॉन्सट्रेटर पहिल्या टप्प्यात खरेदी केले तर दुसऱ्या टप्प्यात आणखी दोनशे कॉन्सट्रेटर खरेदी केले होते. आता साडे बाराशे खरेदी केल्याने एकूण संख्या साडे चौदाशे झाली आहेत. त्यातील दोनशे महापालिकेच्या रूग्णालयात तर उर्वरित नगरसेवकांना देण्यात येणार आहे.
कोट..
नगरसेवक निधीतून खरेदी केलेल्या कॉन्सट्रेटरची मालकी महापालिकेचीच आहे. प्रत्येक नगरसेवकाला पाच या प्रमाणे ते देण्यात येणार असून त्यामुळे प्रभागातील कोरोना बाधितांना दिलासा देणे त्यांना शक्य होणार आहे. तिसऱ्या लाटेसाठी सुध्दा हे उपयुक्त ठरणार आहे.
- कैलास जाधव, आयुक्त, महापालिका