नाशिक : बिटको रुग्णालयात अनेक महिन्यांपासून वापराविना पडून असलेले सीटीस्कॅन मशीन अखेरीस सुरू झाले आहे. महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त कैलास जाधव यांनी रुग्णालयात हे मशीन सुरू केले तसेच पाहणीदेखील केली.
नाशिक महापालिकेचे बिटको रुग्णालय परिसरातील गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्या तर कोविडमुळे नवीन बिटको रुग्णालय हे नाशिक शहरच नव्हे तर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतील रुग्णांना आधार आहे. मात्र, कोरोनाकाळातदेखील येथील सीटीस्कॅन, एमआरआय मशीन तसेच अन्य उपकरणे बंद असल्याने रुग्णांची गैरसोय हाेत होती. महापालिकेकडे कुशल तंत्रज्ञ नसल्याने हे मशीन वापराविना पडून असल्याचे सांगितले जात असले तरी मशीन खरेदी करताना याचा विचार का करण्यात आला नाही, असाही प्रश्न करण्यात येत होता. कोरोनाकाळातील बंद उपकरणांविषयी ‘लाेकमत’ने वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली होती. नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी या ठिकाणी भेट देऊन चोवीस तासात उपकरणे सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर महाराष्ट्रदिनी अखेरीस सीटीस्कॅन सुरू झाले आहे.
महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सीटीस्कॅन कार्यान्वित केले तसेच येथील कामकाजाचा आढावाही घेतला. या ठिकाणी रेडिओलॉजिस्टची नेमणूक करण्यात आली असून, हे मशीन कार्यान्वित केल्याचे आयुक्त जाधव यांनी सांगितले.
यावेळी आयुक्तांनी रुग्णालयाच्या विविध विभागांना भेटी देऊन आरोग्य नियमांचे पालन होते आहे किंवा नाही याची पाहणी केली. यावेळी विभागीय अधिकारी डॉ. दिलीप मेनकर, कोरोना कक्ष अधिकारी डॉ. आवेश पलोड, बिटको रुग्णालयाचे प्रमुख डॉ. जितेंद्र धनेश्वर आदी उपस्थित होते.
इन्फो..
दर निश्चित
महापालिकेचे सीटीस्कॅन बंद असल्याने रुग्णांना खासगी लॅबमध्ये जावे लागत होते. त्यांना मोठा भुर्दंड सहन करावा लागत होता. आता मात्र महापालिकेच्या बिटको रुग्णालयात मशीन सुरू झाले असून, दरदेखील निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार मनपाअंतर्गत दवाखाने, रुग्णालये, प्रसूतिगृहे येथील रुग्णांकरिता एक हजार रुपये व इतर खासगी दवाखाने,रुग्णालये, प्रसूतिगृहे येथील रुग्णांना रुग्णांकरिता १५०० रुपये इतका दर निश्चित करण्यात आलेला आहे.
छायाचित्र आर फेाटाेवर ०२ कैलास जाधव