देवळा : शालेय विद्यार्थ्यांसाठी जादा बस मिळावी या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून पिंपळगाव (वा.) येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनाला अखेर यश मिळाले. बुधवार दि. १ आॅगष्टपासून सटाणा आगाराने विद्यार्थ्यांसाठी जादा बससेवा सुरू केली. यामुळे पिंपळगाव ( वा ) येथील विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाली असून हया जादा बसचे पूजन करून वाहक व चालकाचे स्वागत करण्यात आले. देवळा येथे शिक्षणासाठी येणाऱ्या पिंपळगाव (वा.) येथील ७० ते ८० विद्यार्थ्यांना सकाळी शालेय वेळेत येणार्या सटाणा आगाराच्या बस मध्ये जागा मिळत नसल्याने पैसे खर्च करून खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक आर्थिक व शैक्षणिक नुकसानीबरोबरच मनस्ताप सहन करावा लागत होता. यामुळे विद्यार्थी वर्ग त्रासून गेला होता. विद्यार्थ्यांनी सटाणा आगाराकडे वेळोवेळी जादा बसची मागणी केली होती परंतु मागणी पूर्ण होत नसल्याने शेवटी विद्यार्थ्यांनी सोमवारी व मंगळवारी अभिनव पध्दतीने गाडीच्या टपावर ठिय्या आंदोलन केले होते. अखेर सटाणा आगाराने आंदोलनाची दखल घेत सकाळी सात वा.विद्यार्थ्यांसाठी जादा बस पाठवल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने उपसरपंच नदीश थोरात यांच्या हस्ते चालक व वाहकाचा सत्कार करण्यात आला.
...अखेर विद्यार्थ्यांना मिळाली जादा बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 3:05 PM