नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयातील गर्भवती महिला बेकायदेशीर गर्भपात प्रकरणात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ़ वर्षा लहाडे यांचे निलंबन तसेच त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ़ दीपक सावंत यांनी शुक्रवारी (दि़ ७) विधानसभेत दिली़ या प्रकरणाची सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश व आरोग्य संचालकांमार्फत चौकशी होणार असल्याचेही सावंत यांनी सांगितले़ दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या महापालिकेच्या चौकशी समितीकडून येत्या सोमवारी (दि़ १०) फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे़आरोग्यमंत्री सावंत यांनी विधानसभेत लक्षवेधीवर दिलेल्या उत्तरामध्ये डॉ़ लहाडे यांच्यावर निलंबन कारवाईच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आमदार देवयानी फरांदे यांनी सांगितले़ तसेच सरकारी सेवेत असताना मिळणारा व्यवसायरोध भत्ता (एनपीए) घेऊनही खासगी वैद्यकीय व्यवसायासाठी प्रयाग हॉस्पिटलची उभारणी व त्याद्वारे व्यवसाय सुरू केला़ त्यामुळे या हॉस्पिटलच्या नोंदणीची तपासणी करून नोंदणी केलेली असल्यास ती रद्द केली जाईल़ याबरोबरच गर्भलिंग तपासणी (एमटीपी) व अवैध गर्भपाताच्या (पीसीपीएनडीसी) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला जाणार आहे़, असेही फरांदे यांनी सांगितले.महापालिकेच्या वैद्यकीय पथकाकडे आलेल्या निनावी तक्रारीद्वारे जिल्हा रुग्णालयात मार्च महिन्यात करण्यात आलेल्या कारवाईत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ़ वर्षा लहाडे यांनी २४ आठवड्यांच्या गर्भवती महिलेचा बेकायदेशीरपणे गर्भपात केल्याचा प्रकार समोर आला़ या प्रकरणाची प्रथम आरोग्य उपसंचालक डॉ़ लोचन घोडके यांनी जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जाबजबाब घेतले होते़ तर बुधवारी (दि़ ५) राज्याच्या आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ़ अर्चना पाटील यांनी पुन्हा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ सुरेश जगदाळे, रुग्णालयाचा प्रसूती विभाग, ट्यूब वॉर्डमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जाबजबाब पुन्हा नोंदवून घेत त्याचा सविस्तर अहवाल आरोग्यमंत्र्यांकडे सादर केला़ अतिरिक्त संचालकांच्या चौकशीच्या एक दिवस अगोदर महापालिका व जिल्हा रुग्णालयाच्या संयुक्त पथकाने डॉ़ लहाडे यांच्या दिंडोरी रोडवरील प्रयाग हॉस्पिटलमध्ये तपासणी केली़ त्यात डॉ़ लहाडे या खासगी वैद्यकीय सेवा देत असल्याचे तसेच त्यांनी तीन वर्षांपूर्वी सोनोग्राफी मशिन खरेदी केल्याचे भक्कम पुरावेही पथकाच्या हाती लागले़ या खासगी प्रॅक्टिसचा अहवाल पाटील यांच्याकडे सादर करण्यात आला होता़ दरम्यान, फौजदारी गुन्हा दाखल झाल्यास अंतरिम अटकपूर्व जामिनासाठी डॉ़ लहाडे या जिल्हा न्यायालयात आल्याची माहिती न्यायालयीन सूत्रांनी दिली आहे़ (प्रतिनिधी)
अखेर वर्षा लहाडे यांचे निलंबन
By admin | Published: April 08, 2017 12:26 AM