नाशिक - गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून महापालिकेकडील डांबर संपल्याने शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यात अडचणी येत होत्या. यामुळे नागरिकही त्रस्त झाले होते. अगदी महापालिकेच्या ऑनलाईन ॲपवरदेखील हीच उत्तरे दिली जात होती. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने दिल्यानंतर अखेर पंधरा कोटी रूपयांच्या डांबर खरेदीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. स्थायी समितीने शुक्रवारी (दि. ५) डांबर खरेदीला मान्यता दिली आहे. त्यामुळे किमान शहरातील रस्त्यांची मलमपट्टी होऊ शकणार आहे.
पावसाळ्यानंतर अनेक भागात पडलेले खड्डे जैसे थे असतानाच महापालिकेने भुयारी गटारांची कामे केली. त्याचप्रमाणे काही खासगी कंपन्यांनीही रस्त्यांची खोदकामे केली. यात प्रामुख्याने महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीने शहरात सीएनजी गॅस पाईप टाकण्यासाठी खोदकाम केले तसेच इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपनीनेही अनेक ठिकाणी रस्ते खणले आहेत. मात्र, संबंधित कंपन्यांचे काम झाल्यानंतर महापालिकेने हे रस्ते केवळ माती टाकून बुजवले आहेत. त्यावर डांबर टाकून रस्ते दुरूस्त करण्यासाठी महापालिकेकडे आत्ताच नाही तर गेल्या अनेक महिन्यांपासून डांबर मिळत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. परिसरातील लहान-मोठे खड्डे दुरूस्त करण्यासाठी ॲपवर तक्रार केली तरी डांबर संपले, हेच उत्तर दिले जात आहे. निविदा आणि फेरनिविदेच्या चक्रात अडकलेल्या डांबर खरेदीला अखेरीस मुहूर्त मिळाला असून, सुमारे पंधरा कोटी रूपयांचे डांबर खरेदी करण्याचा स्थायी समितीकडे पाठविलेला प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. दरपत्रक मंजुरीमुळे आता किमान पावसाळ्याचे दोन हंगाम पुन्हा डांबर खरेदीची गरज भासणार नाही, असे बांधकाम विभागाच्या सुत्रांनी सांगितले.
इन्फो..
विभागनिहाय खरेदीसाठी दरपत्रक
महापालिकेच्या सातपूर विभागासाठी ३ कोटी ९ लाख २७९ रूपये, सिडको विभागासाठी २ कोटी ८४ लाख ९४ हजार ९७७ रूपये, नाशिक रोड विभागासाठी २ कोटी ७४ लाख ९७ हजार ५९० रूपये, पूर्व विभागासाठी २ कोटी ३० लाख ८५ हजार ३७७ रूपये, नाशिक पश्चिम विभागासाठी १ कोटी ८० लाख आणि पंचवटीसाठी २ कोटी ५४ लाख ९५ हजार २४७ रूपये याप्रमाणे डांबर खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे रस्ते दुरूस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.
......