नाशिक- ड्रग्ज माफीया ललीत पाटील याच्याशी संबंधीत प्रकरणात ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे यांची आज नाशिकच्या क्राईम ब्रँचने चौकशी केली. आपण काढून टाकलेल्या वाहन चालकासंदर्भात पोलीसांनी चौकशी केली आणि आपण त्यानुसार माहिती दिल्याचे पांडे यांनी माध्यमांना सांगितले.
ड्रग्जमाफिया संशयित ललित पाटील काही वर्षांपूर्वी वापरत असलेला सफारी कार सिडको खोडेमळा परिसरातील एका गॅरेजमध्ये मागील आठवड्यात आढळली होती. पाटीलच्या कारचा अपघात झाल्यानंतर त्याने ही कार दुरुस्तीसाठी या गॅरेजमध्ये दिली होती. यावेळी जो चालक ही कार चालवीत होता, त्याची नाशिक पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीत फारसे काही तथ्य हातीलागलेले नाही, असे पोलिस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
यामुळे संबंधित चालकाचे नाव पोलिसांनी जाहीर केलेले नाही. ही व्यक्ती सध्या एका माजी महापौराच्या वाहनावर चालक म्हणून कार्यरत होता. हे माजी महापौर विनायक पांडे होते. त्यांनी कालच याबाबत पत्रकार परीषदेत सांगताना दीड ते दोन वर्षांपूर्वीच चालकाला कामावरून काढून टाकल्यानंतर त्याच्याशी संबंध आला नसल्याचे सांगितले होते. त्याची माहिती यावेळी पोलीसांना दिल्याचे पांडे यांनी सांगितले.