अझहर शेख, नाशिक: सारूळ शिवारातील खाणपट्ट्यांबाबत जिल्हा प्राधिकरणासमोर सुरू असलेली सुनावणी जाणीवपुर्वक रेंगाळत ठेवण्याचा प्रयत्न खाणपट्टाचालकांकडून होत असल्याचा ठपका जिल्हा प्रशासनाने ठेवला आहे. जोपर्यंत सुनावणी पुर्ण होत नाही, तोपर्यंत सारुळमधील सात व राजुरबहुला येथील एक अशा आठ खाणपट्ट्यांतील उत्खनन स्थगित करण्याचे आदेश अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी काढले आहेत.
नाशिक तालुक्यातील सारूळ शिवारातील गौणखनिज उत्खननाचे खाणपट्टे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. करारनाम्यातील अटी, शर्तींचा भंग करत याठिकाणी उत्खनन सुरू असल्यामुळे महसुलमंत्र्यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी यांना याबाबत चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश महिनाभरापुर्वी काढले होते. येथील अधिकाऱ्यांच्या चमूने पाहणी करून अहवाल शासनाला सादर केला आहे. यानंतर शासनाने केंद्राच्या समितीला ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यासाठी पत्रव्यवहारदेखील केला आहे. दरम्यान, प्राधिकरणाने ३मार्च रोजी काढलेल्या अंतीम आदेशाविरूद्ध थेट उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल करत आव्हान देणार असल्याचे खाणपट्टाचालकांकडून सुनावणीत तोंडी सांगण्यात आले होते. सुनावणीची मुदत वाढवून देण्याची विनंतीही केली होती; मात्र त्यांनी कोणताही अर्ज प्राधिकरणापुढे सादर केला. प्राधिकरणाने वेळदेखील दिला; मात्र २१ मार्चपर्यंत अर्ज किंवा रिट पिटिशनची प्रत खाणपट्टेचालकांकडून प्राधिकरणाला दिली गेली नाही.
यामुळे जाणूनबुजून खाणपट्टेधारक सुनावणी लांबवून प्रकरणातील वस्तुस्थिती प्राधिकरणासमोर येण्यापुर्वी जागेवर होत असलेले उत्खनन सुरूच ठेवण्याचा त्यांचा मानस असल्याचे पारधे यांच्या अंतरीम आदेशात म्हटले आहे.
१८ मे रोजी पुढील सुनावणी
जिल्हा प्रशासनाच्या प्राधिकरणासमोर येत्या १८ मार्च रोजी खाणपट्टाचालकांनी पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे. प्राधिकरणाने खाणपट्टाचालकांना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुनावणीची पुरेशी संधी उपलब्ध करुन दिली होती; मात्र खाणपट्टेधारकांनी रिट पिटिशन दाखल करणार असल्याचे सांगून केवळ सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका प्रशासनाने आदेशात ठेवला आहे.
पर्यावरणाचा ऱ्हास, अटी-शर्तींचे उल्लंघन!
सारुळ शिवारात खाणपट्टेचालकांकडून उत्खनन करताना करारनाम्यातील अटी, शर्तींचे केले गेलेले उल्लंघन व पर्यावरणाचा ऱ्हास बघता सुनावणी पुर्ण होऊन पुढील अंतीम आदेश होईपर्यंत सुरू असलेले खाणपट्टे स्थगित ठेवणे योग्य राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हे खाणपट्टे राहणार बंद
१) शुभांगी बनकर यांचा गट क्रमांक १३९ (सारूळ)२) सिरिल फ्रान्सिस रॉड्रिग्ज गट क्रमांक १२९(सारूळ)३) हरिभाऊ फडोळ यांचा गट क्र १४०/२ (सारूळ)४) श्रीराम स्टोन क्रशर कंपनी गट क्र १२६/१ (सारूळ)५) गणेश स्टोन मेटल कंपनी गट क्र ९२/१ (राजुर बहुला)६) जमुना इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि गट क्र १५/२ (सारूळ)७) मे.भगवती अर्थ मुव्हर्स गट क्र १३८/८(सारूळ)८) प्रताप जोशी यांचा गट क्र १२६/१ (सारूळ) हे सर्व खाणपट्टे जिल्हा प्रशासनाने स्थगित केले आहेत.
३० दिवसांची मुदत
जिल्हा प्रशासनाने काढलेला हा आदेश मान्य नसल्यास नियुक्त केलेल्या अपर आयुक्तांकडे अपील प्राधिकरणाकडे तीस दिवसांत अपील करता येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.