नाशिक : एचडीएफसी बॅँक ते बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतच्या रस्त्याची अवस्था बिकट झाली असताना त्याठिकाणी दुभाजक टाकून सुशोभिकरण करण्याचा घाट घातला जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघड केल्यानंतर महापालिकेने आता त्या मार्गावर डांबरीकरणास प्रारंभ केला आहे. मात्र सिग्नलजवळ आणि अन्यत्रही मोठ्या प्रमाणात खड्डे कायम असून, ते मात्र अद्याप बुजवले गेलेले नाही.महापालिकेच्या वतीने रस्ता रुंदीकरण झाले की, त्याठिकाणी दुभाजक टाकून त्यावर जाहिराती लावून उत्पन्न मिळवले जाते. तसेच दुभाजकाचे सुशोभिकरण प्रायोजकामार्फत केले जाते. मात्र, किमान ज्या रस्त्याची अवस्था बिकट आहे. त्याचे सुशोभीकरण करण्यापूर्वी डांबरीकरण करणे किंवा खड्डे बुजवणे आवश्यक असतानादेखील त्यावर महापालिका कोणतीही कारवाई करीत नाही. जुन्या पोलीस आयुक्तालयाजवळील एचडीएफसी बॅँक ते बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र या दरम्यानच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, सिग्नलजवळच अनेक खड्डे पडले आहेत. तर पुढे शिरवाडकर जॉगिंग ट्रॅकलगत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मात्र, त्याची दुरवस्था असतानाही रस्त्यावर दुभाजक टाकण्याचे काम जोरात सुरू आहे.यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने त्याची दखल घेऊन तातडीने डांबरीकरण सुरू केले आहे. मात्र, डांबरीकरणाचे पट्टे काही भागातच करण्यात आले असून, महापालिकेने मंजूर केलेल्या कामानुसार संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी केली जात आहे.
अखेर ‘त्या’ रस्त्यावरील कामे झाली सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:11 AM