नांदूरवैद्य : कोरोनाच्या कडक निर्बंधामुळे इगतपुरी तालुक्यातील दुग्ध व्यावसायिक अडचणीत सापडले असून, त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. जिल्ह्यासह इगतपुरी तालुक्यात १२ मे ते २३ मेपर्यंत लाॅकडाऊन होता. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जाते; परंतु हा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे लाॅकडाऊन अतिशय चिंताजनक परिस्थिती निर्माण करेल, असे त्यांना कधी वाटलेच नाही. ग्राहकांची बिले, अल्प प्रमाणात दूध विक्री, हाॅटेल, माॅल या सेवा बंद असल्यामुळे दुधाची विक्री होत नसल्यामुळे अनेक दुग्धव्यवसाय डबघाईस आल्याचे कृष्णा डेअरीचे संचालक सोमनाथ गव्हाणे यांनी सांगितले.
लाॅकडाऊन काळात शासनाच्या आदेशानुसार सर्वच ठिकाणी कडक निर्बंध घालण्यात आल्यामुळे औद्योगिक वसाहती, हाॅटेल, माॅल, स्वीटचे दुकाने, तसेच दुग्धजन्य पदार्थांचे दुकाने बंद असल्यामुळे दुधाची पाहिजे तेवढ्या प्रमाणात विक्री झाली नाही. औद्योगिक वसाहती बंद असल्यामुळे यामधील कामगारवर्ग घरीच असल्यामुळे विक्री केलेल्या दुधाची बिले तीन महिने उशिराने मिळणार असल्यामुळे या लाॅकडाऊन काळात जनावरांच्या खाद्यासाठीदेखील आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याचे दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनी या वेळी सांगितले. अनेक ग्राहकांचे हाॅटेल, चहाची दुकाने, तसेच मालवाहू साधने, रिक्षा आदी लाॅकडाऊन काळात बंद असल्यामुळे या ग्राहकांकडून दुधाचे बिल येणे मुश्कील झाले असून, सध्या ग्रामीण भागात शेतीच्या कामांसाठी लागणारे बी-बियाणे तसेच खते, रोगप्रतिबंधक औषधे आदी वस्तू आणण्यासाठी शेतकरी, दुग्ध व्यावसायिकांना मुश्कील झाले असून, या आर्थिक संकटाचा सामना कसा करायचा, असा यक्षप्रश्न येथील दुग्ध व्यावसायिकांसमोर उभा ठाकला आहे.
-------------------
जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर
इगतपुरी तालुक्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत असून, पावसाळा सुरू होण्यापूर्वी कमीत कमी एक महिना पुरेल इतका चारा साठवून ठेवणे गरजेचे असताना आर्थिक टंचाईमुळे ते शक्य नसल्यामुळे जनावरांवरदेखील उपासमारीची वेळ येऊ शकते. यामुळे शासनाने दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणींचा विचार करून मदत करावी, अशी मागणी तालुक्यातील दुग्ध व्यावसायिक शेतकरी करीत आहे.
-------------------------------
लाॅकडाऊन काळात कंपन्या, हाॅटेलसह अनेक महत्त्वाची दुग्धनिर्मित पदार्थांचे दुकाने बंद असल्यामुळे दूध विक्री व्यवसायावर परिणाम झाला आहे. ग्राहकांकडून थकीत बिले मिळण्यास विलंब होत असल्यामुळे जनावरांचा चारा, तसेच शेतीपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन मदत करावी.
- सोमनाथ गव्हाणे, दुग्ध व्यावसायिक शेतकरी