नाशिक : येथील शासकीय संदर्भ सेवा रुग्णालयात रुग्णांसाठी असलेली यंत्रसामग्री वारंवार बिघडत असल्याने गैरसोय होत आहे. त्यामुळे तातडीने त्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाने अंदाजपत्रकात विशेष तरतूद करावी, अशी मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी मंगळवारी विधानसभेत केली.राज्य शासनाच्या वतीने अमरावती आणि नाशिक या दोन ठिकाणीच विभागीय संदर्भ सेवा रुग्णालये आहेत.नाशिकमध्ये या रुग्णालयात गर्दी असते. परंतु वैद्यकीय उपकरणे बिघडल्यास दुरुस्तीसाठी आर्थिक तरतूद नसल्याने मंत्रालयापर्यंत मदत मागावी लागते. त्यामुळे राज्य शासनाने त्यासाठी विशेष तरतूद करावी, त्याचप्रमाणे राजीव गांधी योजनेअंतर्गत रुग्णालयाकडे १५ कोटी रुपये जमा आहेत. परंतु त्याच्या वापराचा अधिकार संबंधित रुग्णालयाला नाही. त्यामुळे या रकमेतून संदर्भ सेवा रुग्णालयावर आणखी दोन मजले बांधावेत, अशीदेखील मागणी त्यांनी केली. त्याचबरोबर रेशन दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ करण्याची मागणीही फरांदे यांनी अन्न व नागरी पुरवठा विषयावरील चर्चेत केली. थेट दुकानापर्यंत विना हमाल माल पोहोचवावा, दुकानाचे भाडे तसेच वीज बिल शासनाने अदा करावे, अशी मागणी फरांदे यांनी केली.त्यावर कमिशन वाढीचे आश्वासन अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिले. जीएसटीमध्ये ज्या वस्तूंना वगळण्यात आले आहे, त्या वस्तूही कर आकारणी करून महागड्या दराने विकल्या जात आहेत, अशा विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणीही फरांदे यांनी केली.
संदर्भ सेवा रुग्णालयासाठी आर्थिक तरतुदीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 11:50 PM