लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांच्याकडे असलेले आर्थिक व धोरणात्मक निर्णयाचे अधिकार अखेर संचालक मंडळाने संपतराव सकाळे यांच्याकडे सोपविले आहेत. यासंदर्भात मंगळवारी बाजार समितीच्या संचालकांची विशेष बैठक घेण्यात येऊन त्यात दहा विरुद्ध एक अशा मतांनी हा ठराव मंजूर करण्यात आला असला तरी, चुंभळे गटाचे पाच संचालक या बैठकीस गैरहजर राहिल्याने एकप्रकारे बाजार समितीतून त्यांचे संस्थान खालसा झाल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे याच विशेष बैठकीत चुंभळे यांचे सभापती व संचालक पद काढण्याचा ठराव सर्वानुमते करण्यात आला आहे.
नाशिक बाजार समितीत सभापती शिवाजी चुंभळे विरुद्ध संचालक अशी लढाई सुरू आहे. त्यातूनच चुंभळे यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध दहा संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार करून त्यांच्याकडून आर्थिक व धोरणात्मक अधिकार काढून ते संचालक संपतराव सकाळे यांना बहाल करण्याची मागणी केली होती. त्यावर जिल्हा उपनिबंधकांनी गेल्या आठवड्यातच यासंदर्भातील आदेश जारी केले होते. त्याच्या अंमलबजावणीसाठी मंगळवारी (दि.११) बाजार समिती कार्यालयात संचालकांची विशेष बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत सभापती शिवाजी चुंभळे व त्यांच्या विरोधात अकरा संचालक उपस्थित होते. त्यावेळी चुंभळे वगळता सर्वांनी संपतराव सकाळे यांना आर्थिक व धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार बहाल करावे, असा ठराव मंजूर केला.कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चुंभळे यांना गेल्यावर्षी कंत्राटी कर्मचाऱ्याला कायम करण्याच्या मोबदल्यात तीन लाख रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती तेव्हापासूनच बाजार समितीत असंतोष खदखदत होता. विरोधी गटाने चुंभळे यांच्या विरोधात उचल खाल्ली व त्याला कायदेशीर जोड देण्यात ते यशस्वी झाले आहेत. त्यासाठी मंगळवारी ही बैठक बोलाविण्यात आली. बैठकीच्या कामकाजाचे संपूर्ण चित्रीकरण करण्यात आले. शिवाय राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बैठकीला उपसभापती युवराज कोठुळे, संपत सकाळे, तुकाराम पेखळे, विश्वास नागरे, प्रभाकर मुळाणे, संजय तुंगार, दिलीप थेटे, ताराबाई माळेकर, शंकर धनवटे, रवि भोये, श्याम गावित उपस्थित होते.