नाशिक : कंपनीच्या शेअर्सचे आमिष दाखवून तब्बल दीड कोटींची फसवणूक झाल्याचा प्रकार दोन दिवासांपूर्वीच घडला असताना पुन्हा शहरात आर्थिक गुन्हा उघडकीस आला आहे. बजाज फायनान्स कंपनीला कर्मचाऱ्यानेच बनावट कागदपत्रांच्या आधारे तब्बल ५९ लाखांना गंडविल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरातीलआघाडीच्या फायनान्स कंपनीच्या विक्री प्रतिनिधीने खोटी कागदपत्रे तयार करून कंपनीला तब्बल ५९ लाख रुपयांना गंडा घातला आहे. संशयित अविनाश कुलकर्णीविरुद्ध एका कंपनीच्या कायदेशीर सल्लागारांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून संशयिताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गेल्या वर्षभरापासून होणारा हा गैरप्रकार काही ग्राहकांनी तक्रार केल्यानंतर बजाज फायनान्स कंपनीच्या निदर्शनास आला. विक्री प्रतिनिधी संशयित कुलकर्णी याने त्याच्या जुन्या १७ ग्राहकांच्या बनावट कागदपत्रांचा वापर करत गंगापूर रोडवरील थत्तेनगर शाखेत बनावट खाती उघडून त्याद्वारे बनावट कर्ज प्रकरणे दाखल केली. या खात्यांच्या माध्यमातून संशयित कुलकर्णी याने तब्बल ५९ लाख ३ हजारांना गंडविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फरार संशयित कुलकर्णीविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फायनान्स कंपनीला ५९ लाखांना गंडा
By admin | Published: January 16, 2017 1:30 AM