नाशिक : वडाळागावातील सिद्ध हनुमान मंदिर ते गोपालवाडी या रस्त्याची दुरवस्था होऊन तीन महिने उलटले आहे, तरीदेखील अद्याप रस्ता दुरुस्त करण्यास महापालिकेला मुहूर्त मिळालेला नाही. भूमिगत गटार कामासाठी रस्ता जेसीबीने उद्ध्वस्त केला गेला. गटारीचे काम पूर्णत्वास येऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.वडाळागावातील सिद्ध हनुमान मंदिर ते श्री. श्री. रविशंकर मार्गापर्यंत गोपालवाडीरोड आहे. भेंडीवाले बाबा दर्ग्यापासून थेट या रस्त्यावरून महापालिकेच्या भुयारी गटार विभागाकडून जेसीबीने खोदकाम करून भुयारी गटार टाकली गेली. या कामाला तब्बल दोन महिने उलटले आहेत, तरीदेखील अद्याप खोदकामाने उद््ध्वस्त झालेला रस्ता दुरुस्त केला जात नसल्याने या भागातील रहिवाशांनी नेमके कोणत्या मार्गाने जावे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गोपालवाडी, गरीब नवाज कॉलनी, सादिकनगर, महेबूबनगर, साठेनगर या सर्व भागांतील रहिवाशांच्या दैनंदिन वापराचा हा महत्त्वाचा रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करणे गरजेचे आहे. हा रस्ता भुयारी गटार कामात पूर्णपणे नष्ट झाला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे व मातीचे ढीग साचले असून, या रस्त्यावरून पायी जाणेदेखील अवघड आहे. त्यामुळे वाहने नेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मनपाच्या पूर्व बांधकाम विभागाने या रस्त्याकडे दुर्लक्ष केले आहे, कारण हा रस्ता भुयारी गटार कामात उद्ध्वस्त झाला आहे.थातूरमातूर दुरुस्तीचा देखावाकारभाऱ्यांकडून रस्त्याला पडलेले खड्डे चक्क जवळील एका जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यामधून निघालेली माती टाकून बुजविण्याचा थातूरमातूर प्रयत्न केला गेला. नळांना सकाळी दैनंदिन पाणीपुरवठा होताच या रस्त्यावरून सांडपाण्याचे पाट वाहू लागतात यामुळे वर्षाचे बारा माहिने या रस्त्यावर पाणी साचलेले दिसून येते. भुयारी गटार कामात झालेले खड्डे माती टाकून बुजविण्याचा प्रयत्न झाल्याने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्याचे संपूर्णपणे डांबरीकरण करून समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्याची मागणी केली आहे.वादात रखडली दुरुस्तीपूर्व विभागाच्या सार्वजनिक बांधकाम व भुयारी गटार या दोन विभागांच्या वादात रस्त्याची दुरुस्ती रखडली आहे. त्याचा त्रास नागरिकांना विनाकारण सहन करावा लागत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनदेखील याप्रकरणी दखल घेतली जात नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
वडाळागावातील रस्ता दुरुस्तीला मिळेना मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 1:03 AM