नाशिक : कोराेनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस व महापालिकेच्या वतीने शहरातील बाजारपेठांमध्ये प्रत्येकी एका व्यक्तीकडून ५ रुपये प्रवेश शुल्क आकारण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी (दि. ३०) दिवसभरात १ हजार ७६५ पावत्या नागरिकांना देण्यात येऊन ८ हजार ८२५ रुपये वसूल केले गेले. तसेच विविध कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ५९ आस्थापनांकडून तब्बल १ लाख ७६ हजार रुपयांचा दंड शहरात वसूल केला गेला.
शहर व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने बाजारपेठांमधील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा प्रशासनाने विविध निर्बंधदेखील जाहीर केले आहेत. मात्र तरीही गर्दी नियंत्रणात येत नसल्याने पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी राज्य पोलीस कायद्याच्या कलम ४३ नुसार मेनरोड या मुख्य बाजारपेठेसह उपनगरीय बाजारपेठांतसुद्धा पाच रुपये प्रवेश शुल्क घेण्याचे आदेश दिले असून त्यानुसार अंमलबजावणी सुरू झाली आहे.
शहर पोलीस व महापालिकेने शहरातील मुख्य बाजारपेठांकडे जाणारे रस्ते बॅरिकेडिंग केले असून प्रवेशासाठी ५ रुपये शुल्क आकारणी सुरू केली आहे. मंगळवारी दिवसभरात भद्रकाली, पंचवटी, गंगापूर, सातपूर, अंबड, इंदिरानगर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील बाजारपेठांसह सिटी सेंटर मॉलमध्ये पावत्या देऊन ग्राहकांना प्रवेश दिला गेला. दिवसभरात १ हजार ७६५ पावत्या ग्राहकांना देण्यात आल्या.