नाशिक : शहरात सर्वाधिक काळ रेंगाळलेला रस्ता म्हणून चर्चेत असलेल्या स्मार्ट रोडचे काम अर्धवट असतानाच या ठेकेदाराला सदोष कामामुळे केलेला प्रतिदिन ३६ हजार रुपयांचा दंड अचानक माफ करण्यात आला आहे. स्मार्ट सिटीच्या सीईओंनी संचालकांची कोणतीही मान्यता न घेता अचानक ठेकेदाराला झुकते माफ दिल्याने पुन्हा एकदा वादाला प्रारंभ झाला आहे. स्मार्ट सिटीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी यापूर्वी स्काडा मीटर घोळात थविल यांना झुकते माप दिले असल्याने आता या घोळाविषयी थेट कुंटे यांनाच जाब विचारण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. स्मार्ट सिटी कंपनीने अर्धवट तयार केलेला त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ या अवघ्या एक किलो मीटर रस्त्याचा विषय गाजतच आहे. अवघ्या एक किलोमीटर रस्त्यासाठी आधी १७ कोटी आणि नंतर आणखी चार कोटी रुपये मंजूर करण्यात आले. मात्र आधीच रेंगाळलेले काम, त्यात रस्त्याच्या खाली जलवाहिनी आणि मलवाहिका टाकताना अभियांत्रिकी नियमांचे पालन झालेले नाही. त्यात भर म्हणजेच रस्त्यावरून चालतानाच रायडिंग क्वॉलिटीदेखील वादग्रस्त ठरली होती. त्यामुळे थेट आयआयटीचे मदत घेऊन रस्ता गुळगुळीत करण्यात येणार होता.मात्र हे काम अद्याप झालेले नाही. त्यामुळे ठेकेदाराला ३६ हजार रुपये प्रतिदिन असा दंड आकारण्यात सुरुवात झाली. रस्त्याचे काम पूर्ण न झाल्याने ही दंड आकारणी सुरूच ठेवण्याची गरज असताना गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून कंपनीचे सीईओ प्रकाश थविल यांनी यांनी परस्पर दंड माफ केला आहे.संबंधित ठेकेदाराकडून आत्तापर्यंत १ कोटी ४४ लाख रुपये वसूल झाले आहेत.---------------------दंडमाफ करण्याचा घाट हाणून पाडणारस्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने परस्पर स्मार्ट रोडच्या ठेकेदाराचा दंड माफ करण्यात आल्याने संचालक संतप्त झाले आहेत. यासंदर्भात कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षांना जाब विचारण्यात येईलच, शिवाय दंड माफ करण्याचा घाट हाणून पाडू असे संचालक शाहू खैरे आणि गुरुमित बग्गा यांनी सांगितले.
स्मार्ट रोडच्या ठेकेदाराला केला ६० लाख रुपयांचा दंड माफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 9:10 PM