सिन्नर : कोरोनाचा संसर्ग वाढत असताना आठवडा बाजारात विनामास्क व सामाजिक अंतर पाळले जात नसल्याने पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाने संयुक्त कारवाई केली. गावात विनामास्क फिरणाऱ्या ३५ नागरिकांकडून सुमारे ७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ग्रामीण भागात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याने प्रशासनाने कोरोनाविरुद्ध गांभीर्याने पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे.
सिन्नर तालुक्यातील वावी येथे मंगळवारी मोठा आठवडा बाजार भरतो. या बाजारात वावी व परिसरातील २५ ते ३० गावांतील नागरिक व विविध व्यावसायिक येत असतात. या सर्वांकडून कोरोनाच्या नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. मात्र, बाजारकरूंकडून मास्कचा वापर केला जात नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने कारवाई करण्याचा निर्णय घेतला.
विनामास्क बेफिकीरपणे वावरणाऱ्या ३५ नागरिकांवर कारवाई करीत ग्रामपंचायत प्रशासनाने प्रत्येकी दोनशे रुपये प्रमाणे सात हजार रुपयांचा दंड वसूल केला. राज्यात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता सरकारकडून कठोर पावले उचललेली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर स्थानिक प्रशासनाला कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याने वावी ग्रामपंचायतीकडून कारवाई करण्यात आली. ग्रामविकास अधिकारी परेश जाधव यांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून कारवाईचा बडगा उगारला. विनामास्क फिरणाऱ्या दुचाकीस्वारांसह पायी चालणारे, दुकानदार, बाजारकरू यांच्यावर कारवाई करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी संदीप सरवार, तात्या वर्षे, मानबहादूर गोरखा आदी उपस्थित होते.
इन्फो...
कोरोना नियम पाळण्याची जबाबदारी सर्वांची आहे. सूचना देऊनसुद्धा कुठल्याही प्रकारची काळजी घेत नसल्यामुळे कारवाई करावी लागली. जर नागरिकांनी अजूनही काळजी घेतली नाही तर यापेक्षाही कडक कारवाई करावी लागेल.
- परेश जाधव, ग्रामविकास अधिकारी, वावी
वावी येथे आठवडा बाजाराच्या दिवशी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करताना वावी ग्रामपंचायत व पोलिसांचे पथक दिसत आहे.
२४वावी १