पिंपळगाव बसवंत: परिसरातील शिर्डी-सुरत महामार्गावर अचानक मोटारसायकलने भरलेल्या ट्रकला आग लागल्याने संपूर्ण कॅबीन जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही . गुजरातहून पिंपळगाव व नाशिकला खासगी मोटरसायकल शोरूमला ५० मोटारसायकल देण्यासाठी येत असलेल्या ट्रक क्र मांक एन.एल. ०१ ए. सी. २४०१ ला अचानक आग लागली. त्यात ट्रकच्या कॅबिनमध्ये शॉर्टसर्किटने आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. ट्रक चालकाने गाडी रस्त्याच्या कडेला लावली व गाडीतून उडी घेतली. ही घटना स्थानिक शेतकरी किशोर अनिल गांगुर्डे यांनी बघितली. त्यांनी आपल्या शेतातील पावडर मारण्याचा ब्लोअर तातडीने भरला व घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आणली. या घटनेची पिंपळगाव अग्निशमनला कळल्यावर बंब काही मिनिटातच घटनास्थळी पोहचला. शेतकऱ्यांच्या मदतीने ती आग आटोक्यात आणल्याने गाडीचा मागील भाग सुरक्षित राहिला व त्यातील ५० गाड्या वाचल्या.
पिंपळगाव बसवंतमध्ये ट्रकला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2020 3:43 PM