जानकी प्लाझाच्या दुसऱ्या मजल्यावरील फिर्यादी सुनील खोडे यांच्या कार्यालयाला ३१ मार्च रोजी सकाळी भीषण आग लागली होती. आगीमध्ये कार्यालयातील सर्व साहित्य जळून खाक होऊन सुमारे २० लाखांचे नुकसान झाले होते. या दुर्घटनेला मधुर बिल्डवेल कंपनीचे संचालक जबाबदार असल्याचा ठपका खोडे यांनी ठेवला होता. मागील वर्षीच हौदाच्या पाण्याची गळती कार्यालयाच्या छतातून आतमध्ये होत असल्याचे खोडे यांनी चेतन पटेल, अरविंद पटेल, प्रदीप पटेल यांच्या लक्षात आणून दिले होते. मात्र, संबंधितांनी याकडे दुर्लक्ष केल्याने मार्च महिन्यात आगीची दुर्घटना घडल्याचे खोडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, पोलिसांनी गुन्ह्याची तीव्रता कमी करण्यासाठी कमकुवत कलम लावले असून, याप्रकरणी पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार असून, न्यायालयातही दाद मागणार असल्याचे खोडे यांनी सांगितले.
--इन्फो--
मनपा, महावितरणकडून चौकशी अहवाल
मनपा विभागीय अधिकाऱ्यांनी मुंबई नाका पोलिसांकडे सादर केलेल्या परीक्षण अहवाल आणि भारतीय विद्युत अधिनियम २००३ च्या कलम १६१ नुसार महावितरणच्या विद्युत निरीक्षकांनी दिलेल्या चौकशी अहवाल आणि खोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कार्यालय जळून २१ लाखांच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संशयित तिघा पटेल व्यावसायिकांविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.