नाशिक : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या फटाक्यांच्या वेगवेगळ्या नमुन्यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयातर्फे बुधवारी (दि.१९) ध्वनिचाचणी घेण्यात आली. यावेळी बाजारात उपलब्ध फटाक्यांपैकी १० प्रकारच्या फटाक्यांची चाचणी करण्यात आली असून, सर्व फटाक्यांची ध्वनिक्षमता १२५ डेसिबलपेक्षा कमी असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपविभागीय अधिकारी ए. जे. कुडे यांनी दिली. अंजनेरी येथील कल्याणी चॅरिटेबल ट्रस्टच्या सपकाळ नॉलेज हबमधील बास्केटबॉल मैदानावर प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे फटाक्यांची नमुना चाचणी घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपविभागीय अधिकारी ए. जे. कुडे, क्षेत्राधिकारी रवि क्षीरसागर, नीतेश मोराणकर, उल्हास कानडे, विनायक रानडे आदि उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने फटाक्यांवर १२५ डेसिबल आवाजाची मर्यादा घातली असून, या मर्यादेपलीकडे आवाज करणाऱ्या फटाक्यांची बाजारात विक्री होत आहे किंवा कसे याची चाचपणी करण्यासाठी अशाप्रकारे बाजारातून फटाक्यांचे नमुने घेऊन चाचणीच्या माध्यमातून ध्वनिमापन करण्याचे आल्याचे कुडे यांनी सांगितले.
फटाक्यांची ध्वनिप्रदूषण चाचणी
By admin | Published: October 20, 2016 2:03 AM