नाशिक : शहर व परिसरात सोमवारी (दि.२४) किरकोळ व मध्यम स्वरुपाच्या आगीच्या पाच घटना घडल्या. यामध्ये वावरे गल्लीतील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटच्या बाल्कनीत आलेल्या फटाक्यांनी सामान पेटले तर पंचवटीत पत्र्यांवरील पालापाचोळा व एका पत्र्याच्या शेडमधील रद्दी मालाला आग लागली. तसेच सिडकोत नारळाच्या वृक्षावरसुद्धा फटाका पडल्याने फांद्यांनी पेट घेतला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी वरील सर्व घटनांस्थळी धाव घेत उडालेला भडका वेळेत शमविला.
दिपावलीनिमित्त लक्ष्मीपुजनाच्या मुहूर्तावर शहरातील सर्वच उपनगरांमध्ये जोरदार आतषबाजी नागरिकांकडून केली गेली. यावेळी पहिली घटना सव्वा आठ वाजता पंचवटीत घडली. येथील आरटीओ कार्यालयाजवळील मेहेरधाम परिसरात पत्र्यांच्या घरांवरील पाळापाचोळ्याने अचानकपणे पेट घेतला. पत्र्यांवर काही फटाके येऊन पडल्याने याठिकाणी आग लागली. त्यानंतर दुसरी घटना रात्री सव्वा नऊ वाजेच्य सुमारास पंचवटीतमध्येच सेवाकुंज भागात घडली. येथील एका भगर मिलच्या आवारातील पत्र्याच्या शेडमधील सामानाने पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच पंचवटी उपकेंद्राच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा करत आग वाढण्याअगोदरच विझविली. त्यानंतर अकरा वाजता सिडकोतील राणाप्रताप चौकाजवळ असलेल्या हनुमान चौकातील नारळाच्या वृक्षाने पेट घेतला. या उंच झाडावर जळते फटाके येऊन पडल्यामुळे त्या ठिणग्यांनी आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सिडको अग्निशमन केंद्राच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत पेटलेले झाड विझविले.
यानंतर अवघ्या पाच ते दहा मिनिटांत वावरे गल्लीत एका दुसऱ्या मजल्यावरील घराला आग लागल्याची माहिती मिळाली. शिंगाडा तलाव येथील लिडिंग फायरमन श्याम राऊत, गणेश गायधनी, विजय नागपुरे, उदय शिर्के, राजेंद्र पवार, संजय जाधव यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले सुदैवाने आग तोपर्यंत बाल्कनीतच होती. हुजेफा बॅगवाला यांच्या मालकीचा फ्लॅटच्या बाल्कनीतील सामान पेटलेले होते. जवानांनी पाण्याचा मारा करुन च्या दुसऱ्या मजल्यावर लागलेली आग अवघ्या काही मिनिटांतच विझविल्याने मोठा अनर्थ टळला. आगीच्या ज्वाला भडकल्याने आजुबाजुच्या लोकांनी अग्निशमनदलाला माहिती कळविली होती.