जातेगाव : नांदगाव तालुक्यातील गोंडेगाव येथील सरोवर वस्तीवर दुपारी ३ वाजेच्या सुमारास राजेंद्र दशरथ गवळी यांच्या शेतातील राहत्या पत्र्याच्या घरास व बाजूस असलेल्या झापास आग लागल्याने संसारोपयोगी वस्तू, गहू, बाजरी, ३५ हजार रुपये रोख, त्यांच्या वैजापूर तालुक्यातील पानगव्हाण येथील भाची वैशाली साहेबराव घायवट हिचे दि. १९ एप्रिल रोजी असलेल्या लग्नासाठी आणलेले कपडे आणि किराणा सामान व जनावरांसाठी साठवून ठेवलेला दोन ट्रॅक्टर चारा सर्व जळून भस्मसात झाले. तसेच बाजूस बांधलेली गाय २० टक्के, वासरू ६० टक्के भाजले गेल्याने येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. देवकर यांनी उपचार केले. येथून पाच कि.मी. अंतरावर बोलठाण येथील आठवडे बाजार असल्याने येथील नागरिक बाजार करण्यासाठी गेले असल्याने व स्वत: राजेंद्र गवळी, पत्नी रुक्मिणीबाई आणि आई गयाबाई हे दुसऱ्याच्या शेतात कामासाठी गेले होते. समाधान व रामेश्वर ही दोन्ही मुले बोलठाण येथे शाळेत गेली होती. शेजारच्या शेतातील काम करत असलेल्या लोकांना धूर दिसल्याने त्यांनी इतरांना मदतीसाठी बोलावले, परंतु मदत मिळण्यापूर्वी सर्व आगीत जळून खाक झाले. जातेगाव येथील तलाठी योगिता निकम यांनी पंचनामा करून पुढील कार्यवाहीसाठी तहसीलदार नांदगाव यांना कळविले असून, एक लाख पंचवीस हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद केले आहे.
गोंडेगावला सरोवर वस्तीवर झापास आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 11:28 PM