नाशिक : द्वारका परिसरातील नागसेननगरमधील एका गॅरेजला रविवारी (दि़१२) मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या आगीत १२ दुचाकी वाहनांसह इतर साहित्य जळून खाक झाले असून, यामध्ये सुमारे पंधरा लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे़ गॅरेजची आग शॉकसर्किटमुळे लागली नसल्याचा दावा विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी केल्याने महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजकंटकांनी हे कृत्य केल्याची चर्चा आहे़ दरम्यान, या आगीच्या कारणांबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार द्वारका सर्व्हिसरोडवरील नागसेननगरमध्ये राजू शर्मा यांचे शर्मा आॅटो इंजिनिअरिंग वर्कशॉप आहे़ या वर्कशॉपला मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास अचानक आग लागली़ या आगीमध्ये १२ दुचाकी, इंजिनिअरिंगची मशिनरी तसेच दुकानातील इतर साहित्य जळून खाक झाले़ सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नसून, सुमारे पंधरा लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे़या परिसरातून गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या ही आग प्रथम लक्षात आली़ त्यांनी तत्काळ अग्निशामक दलास ही घटना कळविली़ अग्निशामक दलाच्या २५ जवानांनी ४ बंबांच्या साहाय्याने ही आग सुमारे तासाभरात आटोक्यात आणली़ या ठिकाणी सुमारे २० वर्षांपासून शर्मा यांचे गॅरेज असून, यापूर्वी अशी घटना घडलेली नाही़ तर गॅरेजचे विद्युत मीटर शाबूत असून ही आग लावण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे़ दरम्यान, ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने समाजकंटकांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे़ (प्रतिनिधी)
गॅरेजला आग; १२ दुचाकी भस्मसात
By admin | Published: February 14, 2017 12:47 AM